Tuesday, June 2 2020 3:16 am

सूर्यावरील खळबळ

सूर्यावर सध्या दोन मोठे काळसर डाग दिसत असून, त्यातून आठवड्याभरात जवळ जवळ सात वेळा सौरज्वाळा फेकल्या गेल्याचे दिसते. यांपैकी ७ सप्टेंबर रोजीच्या सौरज्वाळेत एक अब्ज हायड्रोजन बाँबच्या स्फोटाएवढी शक्ती होती. या प्रकारची ज्वाळा गेल्या बारा वर्षांत प्रथमच शास्त्रज्ञांना दिसली. या सौरज्वाळांनी फेकलेले विद्युत कण व चुंबकीय क्षेत्र याचा परिणाम होणार होता. याचमुळे अमेरिकेच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन केंद्राने योग्य ती खबरदारी घेण्याते आवाहन शास्त्रज्ञांना व तंत्रज्ञानाना आवाहन केले होते.

सूर्याच्या या ज्वाळाचा परिणाम प्रत्यक्षपणे मानवी शरीरावर होत नाही; कारण पृथ्वीच्या भोवतालचे वातावरण व चुंबकीय क्षेत्र क्षेत्रामुळे हे कण अपाल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र, त्यांचा पृथ्वीभोवतलाच्या वातावरणावर मोठा परिणाम होताना दिसतो. या विद्युत भारीत कणांमुळे वातावरण फुगते. यामुळे कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा ढासळतात. त्यांच्या रेडिओ संदेश वहनात व एकंदरीतच दळणवळणात बिघाड होऊ शकतो. चुंबकीय क्षेत्रात गडबड होत असल्याने विद्युत प्रवाहात देखील बिघाड होऊ शकतो. सुदैवाने, आता सूर्यावरचे हे डाग पृथ्वीच्या दिशेपासून दूर गेल्याने त्यांचा धोका टळला असल्याने शास्त्रज्ञांचा जीव भांड्यात पडला आहे.

आपला सूर्य पृथ्वीच्या व्यासाच्या एकशे दहा पट मोठा असून, तो हायड्रोजन आणि हेलियम वायूंचा प्रचंड मोठा गोळा आहे. त्याच्या केंद्रभागात अणुभट्टी पेटली असून, दर सेकंदाला ६५ कोटी टन हायड्रोजनचे ज्वलन होत आहे. सूर्याची ऊर्जा केंद्राकडून पृष्ठभागाकडे येते. त्यामुळे पृष्ठभागावर सहा हजार अंश तापमान असते. या पृष्ठभागावर अधून मधून कमी तापमानाचे काही भाग दिसू लागतात. त्यामुळे ते तेजस्वी पृष्ठभागापेक्षा काळसर दिसतात. सूर्यावरचे हे काळे डाग दर अकरा वर्षांनी जास्त प्रमाणात दिसतात. यावेळी या डागांची संख्या शंभरावर जाऊ शकते. प्रत्यक्षात छोट दिसणारे हे डाग पृथ्वीच्या व्यासापेक्षा सात ते आठ पट मोठे असू शकतात. या डागांच्या पोटात मोठ्या प्रमाणात चुंबकीय रेषांचा गुंता होत असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढले आहे.

सौरडागांमुळे सौरज्वाळा व वायूंच्या कणांचे ढग (करोनल मास इजेक्शन) यांचा जन्म होत असावा. यामुळे जेव्हा सूर्यावर मोठ्या प्रमाणात डाग दिसू लागतात तेव्हा सूर्यावरून सौरज्वाळा व वायूच्या कणांचे ढग अंतराळात फेकले जातात. ते पृथ्वीजवळ आल्यावर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्यांना थोपवते. मात्र, काही प्रमाणात हे कण पृथ्वीच्या ध्रूव प्रदेशाकडे वादळ निर्माण करतात. याचा परिणाम म्हणून विद्युत ट्रान्सफार्मर बिघडणे, उपग्रह व जीपीएस यंत्रणेच्या दळणवळणात खंड पडणे, उपग्रहांच्या कक्षा ढासळणे यांसारखे दुष्परिणाम दिसतात. आधुनिक काळात आपण मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन, टेलिफोन, टीव्ही आणि जीपीएस वारत असल्याने या सर्वावर सौरवादळाचा परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे सूर्यावर नजर ठेवण्यासाठी पृथ्वीवरील व अंतराळातील अनेक दुर्बिणी कार्यरत आहेत.

सूर्यावर ४ सप्टेंबर रोजी खळबळ दिसू लागली. रात्री बारा वाजता एक ज्वाळा दिसली. नंतर त्याच ठिकाणी सोलर डायनॅमिक ऑव्हेटरीला व स्वीडिश सोलर टेलिस्कोपला ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अजून एक मोठी ज्वाळा दिसली. अवघ्या तीन तासांत त्याच परिसरात दुसरी मोठी सौरज्वाळा दिसल. या दोन्ही ज्वाळांमुळे उधळलेले कण सहा सात तासांत पृथ्वीवरच्या वातावरणावर आढळले आणि त्यामुळे तासभर रेडिओ ब्लॅक आउट म्हणजे संदेश बंद पडले. नंतरच्या दोन-तीन दिवसांत अजून काही सौरज्वाळा शास्त्रज्ञांना दिसल्या. या सौरज्वाळांनी फेकलेले विद्युत कण व प्लाझमा पृथ्वीवर कधी पोहोचेल व त्याचे परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर काय होतील, याची निरीक्षणे शास्त्रज्ञ घेत आहेत.