Monday, June 1 2020 12:45 pm

सुरत मध्ये तक्षशीला कॉम्पलेक्स मध्ये भीषण आग; आगीत १७ जण ठार

गुजरात :- सुरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्पलेक्स इमारतीला भीषण आग लागली असुन या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. इमारतीला लागलेली आग ही भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. ३५ जण अडकल्याची माहिती आहे. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. तक्षशीला कॉम्पलेक्स हे एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र एसी डक्ट्स आणि कॉम्प्रेसर्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.