Saturday, June 14 2025 5:10 pm

सी पी तलाव येथील कचरा 31 ऑगस्टपर्यत पूर्णपणे उचलला जाईल – आयुक्त सौरभ राव

ठाणे 16 : वागळे इस्टेट सी पी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार गेल्या तीन दिवसात किती कचरा उचलण्यात आला, तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज (15 ऑगस्ट)केली. सी पी तलाव हा परिसर कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्टपर्यत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त श्री. राव यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी तसेच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरूमुखसिंग स्यान, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनिषा कांबळे आदी उपस्थित होते.

सी पी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मुलभूत उद्देश होता की येथे छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यत घेवून जाईल परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप प्राप्त होवून या ठिकाणी जवळ जवळ 30 हजार मेट्रिक टन कचरा जमा झाला होता, या परिसराला कचरा मुक्त करण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यात आली असून दिवसरात्र सदरचा कचरा हा उचलला जात आहे. सदरचा कचरा हा शासनाकडून आतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जात आहे, तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोक्‌त पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक संस्थांनी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे गोवा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, वाराणसी या ठिकाणी ज्या पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी मी स्वत: भेटी देवून त्याची पाहणी करुन माहिती घेतली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत, त्यापैकी सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर ठाण्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल व ठाणेकरांची या समस्येतून मुक्तता केली जाईल असेही आयुक्त्‍ सौरभ राव यांनी यावेळी नमूद केले.

सी पी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे, याचीही पाहणी ही आयुक्त राव यांनी यावेळी केली.