Monday, June 17 2019 4:33 am

सीडीआर प्रकरणात अभिनेत्री उदिता गोस्वामी आणि दिगदर्शक मोहित सुरीची चौकशी

ठाणे: बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर प्रकरणात ९ खासगी गुप्तहेरांसह एकूण १३ आरोपींना अटक केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एककडून आज बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी आणि तिचा पती दिगदर्शक मोहित सूरी याला चौकशीसाठी बोलावले होते. या दाम्पत्याची दोन तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सीडीआर प्रकरणातील सेलिब्रिटींची मांदियाळी कायम असल्याचे दिसून आले.

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या टीमने उकल केलेल्या सीडीआरप्रकरणात मॉडेल रोझलीन खान व अभिनेते जॉकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांचा जबाब आतापर्यंत नोंदवला होता. यामध्ये गुप्तहेर माकेश पांडीयन याच्याकडून दोन मोबाईल धारकांचे सीडीआर घेतल्याप्रकरणी जिग्नेश छेडा याला अटक केल्यानंतर आज अभिनेत्री उदिता गोस्वामी हिला पती मोहित सूरीसह चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. वकील रिझवान सिद्धीकी यांच्याकडून उदिता हिने पती मोहितचे सीडीआर घेतल्याप्रकरणी तिचा जबाब नोंदविण्यात आला. उदिता हिने जहर, अक्सर अशा चित्रपटांमधून काम केले असून तिचा पती मोहित सूरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक आहे. त्याने आशिकी २, मर्डर २, आवारापन, हाफ गर्लफ्रेंड अशा चित्रपटांचे दिगदर्शन केले असून प्रसिद्ध दिगदर्शक महेश भट यांचा मोहित पुतण्या आहे.