जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी रक्तदान करुन मोहिमेत दर्शविला सहभाग
ठाणे, 20 :- ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज भासत आहे. ही रक्तदान मोहीम आज शुक्रवार, दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हील रूग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे सुरु झाली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत ही मोहीम दररोज सुरू राहणार आहे.
आज जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी रक्तदान करुन या मोहिमेत सहभाग दर्शविला. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. स्मिती आडे, डॉ. सायली लखोटे, डॉ. योगेश बडक, वरिष्ठ नर्स शीला भंडारे, टेक्निशियन सुजाता होले, श्री. गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक राजू भोये हे उपस्थित होते. रक्तदान केल्यानंतर रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. स्मिती आडे यांच्या हस्ते श्री. सानप यांना प्रशस्तिपत्र व रक्तदाता नोंदणी कार्ड देवून सन्मानित करण्यात आले.
या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी, युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करुन या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.