मुंबई, 11 : – श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण व सोयी-सुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
श्री सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, या कामासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शन रांग त्यातील सुविधा आदी विविध बाबीसंदर्भात सादरीकरणात माहिती देण्यात आली. या कामांचा संदर्भात तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करून, येणाऱ्या गणेश चतुर्थीला कामांचा शुभारंभ करता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.