Friday, May 24 2019 7:05 am

सिडकोची लवकरच आणखी ९0 हजार घरे

नवी मुंबई : यंदाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको लवकरच तब्बल ९० हजार घरे बांधणार आहे. मंगळवारी झालेल्या राज्य सुकाणू समितीने या गृहनिर्मितीला मंजुरी दिली असून, केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या माध्यमातून एक लाख घरांची निर्मिती केली जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली होती. या संदर्भात सिडकोने सादर केलेल्या प्रस्तावाला समितीने मंगळवारी मंजुरी दिलीे. ९० हजारांपैकी ५३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. उर्वरित ३७ हजार घरे अल्प उत्पन्न घटकांसाठी आहेत. यातील २५ हजार घरे तळोजात बांधली जातील, तर उर्वरित जुईनगर, खारकोपर, बामणडोंगरी व खारघर रेल्वे स्थानक परिसरात उभारणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
कळंबोलीसह तीन ट्रक टर्मिनलच्या जागेवरही घरांची निर्मिती होणार आहे. ट्रक टर्मिनलच्या वर निवासी संकुल बांधण्याची योजना आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळताच त्यांच्या निर्मितीला सुरुवात होईल, असे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.