Wednesday, March 26 2025 5:25 pm

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान

• मंगळवार, १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह
• लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यान
• ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’
ठाणे (१६) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, १८ रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र जीवन आणि युगप्रर्वतक कार्य’, यावर ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून ते सगळ्यांसाठी खुले आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लेखन केले. १९३२ साली वडिलांसोबत सांगली जिल्ह्यातून ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा त्यांनी आत्मसात केला. मुंबईत परतले तो काळ १९४२ च्या चळवळीचा. मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊ यांचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले.
तमाशात परंपरेने चालत आलेला गण बदलून टाकला. त्याजागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. आरंभाला खऱ्या-खोट्याचे कोडे घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचे कुतूहल वाढवीत त्यांनी व्यथा वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून कथा-कादंबऱ्यांतून मांडला. अण्णाभाऊ यांनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली. अण्णाभाऊ यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. त्यांच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊ यांच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय.
अण्णाभाऊ यांचे साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. अण्णाभाऊ यांच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अण्णाभाऊ यांची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यावर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कला गुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रे यांच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली.
वक्ते – ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. शरद गायकवाड
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र जीवन आणि युगप्रर्वतक कार्य,’ यांचा परिचय व्हावा यासाठी ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रा. डॉ. गायकवाड हे मूळचे साताऱ्याचे आहेत. कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात ते प्राध्यापक आहेत. १९९० मध्ये त्यांनी सातारा येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे अकादमीची स्थापना केली. ‘मराठी साहित्यातील मातंग समाज’ हा त्यांच्या पीएच. डीच्या प्रबंधाचा विषय होता. राज्य शासनाच्या लहुजी साळवे मातंग समाज आयोगाचे ते तज्ज्ञ सदस्य होते. मातंग समाज – साहित्य आणि संस्कृती, अण्णाभाऊंचा भाऊ – शंकर भाऊ साठे. बहुजनवादी साहित्य (क्रांतीचं कुळ आणि बंडाचं मूळ) हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत.
विचारमंथन व्याख्यानमाला
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले.