ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे ८० जणांना तत्काळ नोकर्या मिळाल्या आहेत. तर, २०८ जणांना लवकरच नियुक्तीपत्र विविध कंपन्यांकडून देण्यात येणार आहे.
सावकरनगर येथे मयूर शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या हस्ते आणि मा. नगरसेवक हणमंत जगदाळे, मा. परिवहन सदस्य संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. कोविड काळात उत्तीर्ण झालेल्यांना नोकर्या देण्यात अनेक व्यवस्थापन नकारघंटा वाजवित असताना, याच काळातील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करुन नवीन सुरुवात केली आहे. या मेळाव्यात अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण घेतलेल्या 48 उमेदवारांसह सुमारे 208 पेक्षा अधिक तरुणांनी आपला बायोडाटा जमा केला. त्यापैकी 80 जणांना ‘ऑन दि स्पॉट’ नियुक्तीपत्र देण्यात आले. तर, ३५ जणांना पॅकिंग आणि हाऊस किपींगसाठी निवडण्यात आले आहे. त्यांना आगामी आठवड्याभरात नियुक्तीपत्र दिले जाणार असून उर्वरित तरुणांनाही लवकरच नोकरी मिळणार आहे.
यावेळी आनंद परांजपे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावरकर नगर भागात भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. एकीकडे मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढत असतानाच मा. नगरसेवक अमीत सरैय्या आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सामाजिक भान राखत राष्ट्रवादीच्या वतीने तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला आहे. त्याचे कौतूकच करायला हवे, असे म्हटले.
मा. नगरसेवक अमीत सरैय्या यांनी आज राष्ट्रवादीच्या वतीने वर्धापन दिनाचे आचित्य साधून हा मेळावा आयोजित केला आहे. कोरोनामुळे सर्व लोकांची घडी विस्कटली आहे. अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. आता कुठे सहा महिने झाले लोक स्थिर होत आहेत. पण, रोजगार नसल्याने अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. आता किमान 208 जणांनी आपले अर्ज दिले असून या ठिकाणी तत्काळ ८० जणांना नोकर्या मिळाल्या आहेत; उर्वरित तरुणांना लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येतील, असे सांगितले. तर, राष्ट्रवादीच्या वतीने रोजगार मेळावे आयोजित केला आहे. कोरोनामुळे खूप जणांचे रोजगार गेले आहेत. अशा तरुणांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मयूर शिंदे यांनी सांगितले.