ठाणे (16) : ठाणे शहरातील स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा व्हावी यासाठी महापालिकेकडून मोहिम स्वरुपात विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतानाच नागरिकांनी जर त्यात योगदान दिले नाही तर शहर स्वच्छ राखणे कठीण होवू शकते. ठाणे शहरातील नागरिक हे स्वच्छतेबाबत फार मोठ्या प्रमाणावर सजग आहेत, मात्र काही ठराविक नागरिक अजूनही स्वच्छतेविषयी आपल्या जबाबदारीचे पालन करताना दिसून येत नाही. शहर स्वच्छ राखण्यासाठी अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा अप्रिय निर्णय घेणे आवश्यक ठरते.
ठाणे शहरात आजपर्यंत उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका / शौच करणे, थुंकणे, पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता याबाबत दंड लावण्यात आले होते. परंतु शहरात स्वच्छता मोहिम अधिक तीव्र स्वरुपात हाती घेण्यात आली असल्यामुळे दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
संपूर्ण महापालिका नियमित स्वच्छता होत असून ही मोहिम व्यापक स्वरुपात सुरू राहणार आहे. यामध्ये शहरे हागणदारी मुक्त करणे व शहराची साफसफाई, कचरा संकलन वाहतुक व विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. याचे पालन जे व्यक्ती/संस्था यांचेकडून होणार नाही. त्यांचेवर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु सदर दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नागरिकांना दंड लावून देखील त्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार रस्ते/मार्गावर घाण करणे/कचरा फेकणे सध्याची दंडाची रु.180, सुधारित दंडाची रक्कम रु.500, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सध्याची दंडाची रु.150, सुधारित दंडाची रक्कम रु.500, उघडयावर लघवी/लघुशंका करणे सध्याची दंडाची रु.200, सुधारित दंडाची रक्कम रु.1000, उघडयावर शौच करणे सध्याची दंडाची रु.500, सुधारित दंडाची रक्कम रु.1000 व सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणे सध्याची दंडाची रु.180, सुधारित दंडाची रक्कम रु.1000 असा बदल करणेचा निर्णय घेण्यात आला आहे.
——
नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूक करणे अपेक्षित असते. स्वच्छतेमध्ये ठाणे शहरात आजपर्यंत जे सकारात्मक काम झाले ते शहरवासीयांच्या सहभागामुळेच होवू शकते. मात्र जे नागरिक आपल्या कृतीमधून या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करणे आवश्यक ठरते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
*श्री. अभिजीत बांगर – महापालिका आयुक्त, ठाणे*.