Monday, January 27 2020 3:59 pm

“सायमन गो  बॅक ” ला स्थगिती-सेनाप्रमुखांच्या मध्यस्थीने आयुक्त-महापौर दिलजमाई

ठाणे : पालिकेच्या महासभेत आयुक्त आणि अधिकारी वर्ग गैरहजर राहिल्याने उद्भवलेल्या वादंगामुळे सभागृहात काँग्रेस गटनेते विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव ठेवीत “सायमन गो बॅक चा नारा दिला. पत्र प्रपंच करीत वाद चिघळला होता. अखेर पालिका आयुक्त जयस्वाल आणि महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी मध्यस्थी करीत मातोश्रीवर बैठक घेऊन “सायमन गो बॅक ” ला स्थगिती दिली. अखेर आयुक्त आणि महापौर व लोकप्रतिनिधी यांच्यात दिलजमाई झाली. या दिलजमाई मुळे ठाणे शहराच्या विकासाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि लोकप्रतिनिधीमध्ये कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता. महासभेत अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित न राहणाऱ्या पालिका आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांच्याकडून मांडण्यात आला होता. तर माजी महापौर अशोक वैती यांनी या ठरवाला अनुमोदन दिले होते. त्यानंतर स्वतः पालिका आयुक्त जयस्वाल यांनी आपल्यावर अविश्वास ठराव आणण्यासंदर्भातील पत्रच महापौरांना दिले होते. आयुक्तांच्या पत्रानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मातोश्रीवर मंगळवारी बैठक झाली असून या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर मीनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.  महापौर आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीही आयुक्तांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने हा वाद शमला. तसेच आयुक्तांचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना वादविवाद न करता सलोख्याचे संबंध ठेवण्याचा मानस अंगिकारल्याने अखेर पालिकेमध्ये शिगेला पोहचलेला वाद शमला आणि पालिका आयुक्त आणि महापौर सत्ताधारी यांच्यात दिलजमाई झाली.  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता हा वाद संपुष्टात आला असल्याचे दोघांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे