मुंबई, 20 : सांगली जिल्ह्यातील सांगली – कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णा नदीवरील अंकलीपूल येथे कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भात विधानसभा सदस्य जयंत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मे.स्वप्नपूर्ती शुगर लि. आसवनी विभाग- मे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.) या कारखान्याच्या स्पेंटवॉशयुक्त सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मे.श्री दत्त इंडिया प्रा. लि.(साखर विभाग मे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.) सांगली या साखर कारखान्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारखाना बंद करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण यंत्रणामार्फत करण्यात आलेल्या पाहणीत सांगली शहरातून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता शेरीनाल्याद्वारे कृष्णा नदी पात्रामध्ये तसेच काही प्रमाणात सांडपाणी उपसा पंपाद्वारे सांगली बंदराच्या खालील बाजू सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सांगली मिरज- कुपवाड शहर महानगरपालिकेस नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या भागात आरोग्याच्या दृष्टीनेही जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या वतीने पाहणी केली असता जलजन्य आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.
सांगली महानगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 62 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.