Wednesday, February 26 2020 10:28 am

साई जन्मस्थळ वाद मिटला

 शिर्डी : साईभक्तांनी श्रद्धा व सबुरी ठेवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. पाथरी हे साईबाबांचे जन्मगाव असल्याचा उल्लेख काढून टाकण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत दाखविल्याने पाथरी हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यास शिर्डीकरांची हरकत नसल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. पाथरीचाही विकास व्हावा, ही शासनाची भूमिका असल्याचे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

साईबाबांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्य़ातील पाथरी असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या बैठकीस या तीर्थस्थळ क्षेत्राच्या विकास आराखडय़ासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यावरून शिर्डीकर ग्रामस्थ संतप्त झाले होते.  या पेचातून मार्ग काढण्यासाठी ठाकरे यांनी सोमवारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व शिर्डी ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीस आमंत्रणच नसल्याने पाथरीचे ग्रामस्थ मात्र उपस्थितच नव्हते. साईबाबांचे जन्मस्थळ कोणते, याबाबत शासनाची कोणतीही भूमिका आतापर्यंत नव्हती, ती तशीच राहावी, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी व्यक्त केली.