Saturday, June 14 2025 5:34 pm

सांगोला व मंगळवेढ्यातील चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान लवकरच देण्यात येणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, 11 : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात एप्रिल २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत १४६ चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान लवकरच वितरित करण्यासंदर्भात राज्य कार्यकारी समितीला निर्देश देण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना श्री. जाधव- पाटील बोलत होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्यातील १४६ आणि मंगळवेढा तालुक्यातील ६१ चारा छावण्यांसाठी अनुक्रमे ₹२०.८६ कोटी आणि ₹१२.०७ कोटी इतक्या सुधारित अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चारा छावणीसंदर्भातील प्रलंबित अनुदानाबाबतचा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून करण्यात येणाऱ्या खर्चास राज्य कार्यकारी समितीची मान्यता आवश्यक असते. त्यासाठी हा सुधारित प्रस्ताव या समितीकडे पाठवला आहे.

यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश समितीला देण्यात येतील. राज्य कार्यकारी समितीच्या मंजुरीनंतर निधी वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव- पाटील यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य सर्वश्री समाधान आवताडे, सुभाष देशमुख, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.