Saturday, January 23 2021 12:42 pm

सर्व बाधित सफाई कामगारांना भरपगारी रजा द्या – आ.संजय केळकर

ठाणे : कोरोनाविरोधी लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे काही सफाई कामगार कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र उपचाराच्या काळात त्यांची रजा बिनपगारी धरली जात आहे, ही दूर्दैवाची बाब आहे. या कामगारांना पगाराबरोबरच अन्य सुविधाही द्याव्यात,समान वेतनवाढची मागणी आ.संजय केळकर यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका महत्त्वाची असून शेकडो कामगार अखंडित काम करत आहेत. एकप्रकारे ते कोरोनायोद्धाच आहेत. मात्र संसर्ग वाढीमुळे काही सफाई कामगार बाधित झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण कामावर हजर राहू न शकल्यामुळे त्यांची बिनपगारी रजा धरली जात आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे आ.संजय केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सेवा करताना संसर्ग झालेल्या अशा कामगारांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना पगारापासून वंचित ठेवणे उचित नाही. त्यांना उपचार कालावधी जेवढे दिवस असेल ती रजा भरपगारी द्यावी, सर्व कामगारांना विमा संरक्षण द्यावे आणि कामगारांच्या कुटुंबांना सहकार्य करून वैद्यकीय मदत मोफत द्यावी, अशी मागणी आ.केळकर यांनी केली आहे.याबाबत सफाई कामगारांमध्ये असंतोष असून तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.