Monday, April 21 2025 10:09 am
latest

सर्वंकष स्वच्छता मोहीम शनिवारी माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात

• शनिवारी सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने होणार महास्वच्छता अभियान
• रस्ता झाडणे, घासणे आणि धुणे अशी तीन स्तरात होणार सफाई
• पूर्वतयारी मोहिमेत १७ भंगार वाहने हटवली

ठाणे (१९) – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिम (#DeepCleaningCampaign) शनिवार, २० जानेवारी रोजी माजिवडा-मानपाडा या ठाणे महापालिका क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या प्रभाग समितीत राबविण्यात येणार आहे. त्याच जोडीने मंदिर स्वच्छता अभियानही शिवमंदिर, आशापुरा देवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आदी मंदिरे आणि परिसरातही राबविण्यात येणार आहे. या शनिवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ता झाडणे, घासणे आणि धुणे अशी तीन स्तरात सफाई होणार आहे. महापालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने हे महास्वच्छता अभियान होणार आहे.

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिम (#DeepCleaningCampaign) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात सुरू आहे. आतापर्यंत, वागळे इस्टेट, वर्तकनगर, नौपाडा-कोपरी या प्रभाग समिती क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली आहे. माजिवडा-मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदाने, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विर्सजन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर खालील भाग आदी ठिकाणी सफाई मोहीम होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिली.

या मोहिमेत महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभागही सहभागी होणार आहे. तसेच, विविध सामाजिक संस्था तसेच एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचाही या मोहिमेत सहभाग असणार आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नियोजन व पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी शुक्रवारी घेतला.

या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून या प्रभाग समिती क्षेत्राता मेट्रो तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून सफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, रस्त्यावर उभी असलेली सुमारे १७ भंगार वाहनेही हटविण्यात आली आहेत. हा भाग पोस्टरमुक्त करण्यासाठीही पथके कार्यरत आहेत. गृहनिर्माण संस्था, टाऊनशीप यांनी त्यांच्या अंतर्गत भागात तसेच, सभोवतालीही साफसफाई करावी, अशी सूचना देण्यात आल्याची माहिती माळवी यांनी दिली.

त्याचबरोबर, मंदिराच्या सफाईसाठी विहिरींचे पाणी वापरले जाणार असून रस्ते सफाईसाठी जेटींग मशीन करता पुर्नप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, तसेच, जलशुद्धीकरण प्रकल्पातील पिण्याचे पाणी या कामासाठी वापरले जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्वंकष स्वच्छता मोहिम कशी असेल?

शनिवारी सकाळी ६.३० वाजता या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस (#DeepCleaningCampaign) सुरुवात होणार आहे. माजिवडा-मानपाडा विभागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मैदाने, मार्केट परिसर, फूट ओव्हर ब्रीज ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र टीम लीडरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक असलेले मनुष्यबळाचे नियोजनही करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कामाचे क्षेत्र निश्चित करुन यामध्ये सुरूवातीला रस्ता, फूटपाथ झाडणे, मग स्क्रबरने फूटपाथ, कर्ब स्टोन, डिव्हायडर साफ करणे, यामधून पडणारी माती गोळा करणे आणि त्यानंतर हाय प्रेशर पंपाने फूटपाथ, कर्बस्टोन, डिव्हायडर व त्यालगत असलेल्या भिंती धुणे अशा पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे.
या बैठकीस, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तायडे, सहायक आयुक्त प्रितम पाटील, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते.