Wednesday, February 26 2020 10:24 am

सरस्वती शाळेत घडले आगीचे मॉक ड्रील

ठाणे : संपूर्ण देशभरात आज शाळांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रील करण्यात आली. ठाण्यात आनंदनगर येथील सरस्वीत विद्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने मॉक ड्रील केले. तसेच आग लागल्यानंतर काय केले पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना देण्यात आले.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले आहे. एवढे नाही तर शाळेमध्ये लागणार्‍या आगीवर कसे नियंत्रण मिळवावे, कुणाला कॉल करावे याबाबतही प्रशिक्षण देणे बंधनकारक असते. शाळेमधील अग्निशमन यंत्रणा कशा हाताळल्या पाहिजेत, याचे प्रशिक्षणही महत्वाचे असते. त्यामुळे शाळा इमारतींमधील मॉक ड्रीलला विशेष महत्व आहे. 21 जानेवारीला देशभरात शाळांमध्ये आग विझविण्यासंबंधीचे मॉक ड्रील केले जाते. त्यानुसार सरस्वती विद्यालयामध्ये मॉक ड्रील झाले. शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. ढवळे यांच्या सहकार्याने बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी गिरीश झलके यांनी मॉड ड्रील करताना विद्यार्थी आणि शिक्षक, कर्मचार्‍यांना आग कशी विझविली जाते, अग्निशमन दलाचे जवान कशाप्रकारे काम करतात, आग विझविण्यासाठी अग्निरोधक यंत्राचा कसा वापर करायाचा याचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. यावेळी शाळेतील केमिस्टी लॅबमध्ये आग लागली आणि सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले आणि दोन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.