Saturday, August 24 2019 11:07 pm

सरपंच आणि ग्रामसेवक तयार करणार शाश्वत स्वच्छतेचा आराखडा

ठाणे :  ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ सुंदर राहावा यासाठी सातत्याने जिल्हा परिषदेच्या माध्यातून उपक्रम राबवले जात असून गावात शाश्वत स्वच्छता नांदावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक एकत्रितपणे शाश्वत स्वच्छतेचा आराखडा तयार करणार आहेत. हा आराखडा कसा तयार करायला हवा याबाबतची आज कार्यशाळा संपन्न झाली असून या मंडळींना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.

ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त झाल्या नंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता रहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण तालुक्यात युनिसेफचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे यांनी शाश्वत स्वच्छता आराखडा कसा तयार करावा याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी कल्याण तालुक्याच्या ४६ ग्रामपंचायतीचे  ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे , गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत वयैक्तिक स्वच्छता, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, शालेय आणि अंगणवाडी शौचालय वापरण्या योग्य करणे, तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी आदी  विषयावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.