Friday, January 17 2020 8:14 pm

सरकारी धोरण वृत्तपत्रांना बाधक-नव्या तंत्राने पत्रकारिता करा-एस एन देशमुख

मुंबई : वृत्तपत्रांना सरकारी धारण बाधक ठरत आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून नव्या तंत्राने पत्रकारिता करणे गरजेचे आहे. आता ऑनलाईन वृत्तपत्रे, यूट्यूब चॅनल, तसेच पोर्टल, ब्लॉग आदीच्या माध्यमांनी वृत्तपत्राची जागा घेतली आहे. त्यामुळे वाचक कमी झाला. परिणामी वृत्तपत्राचा खप कमी झाला असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एन देशमुख यांनी व्यक्त केले. मुंबई येथील मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात देशमुख उपस्थित होते.
          पुढे बोलताना एस एन देशमुख म्हणाले,  सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केल्याने पत्रकारावरील हल्ले कमी झाले आहेत. आता पत्रकारांना निवृत्तीवेतन लागू करण्यात आले असून त्यामुळे वृद्धापकाळात पत्रकारांना आर्थिक आधार मिळू शकेल असा आशावाद व्यक्त केला. तर याच कार्यक्रमाला उपस्थित जेष्ठ पत्रकार  सुकृत खांडेकर यांनी आपल्या भाषणात  वृत्तपत्रांचा खप कमी होत आहे. त्यामुळे आता माध्यमात नव्या जोमाच्या पत्रकारांच्या नोकरीच्या संधी कमी होत आहे. नव्या तंत्रविज्ञानामुळे पत्रकारांची गरज कमी होत चालली आहे. त्यामुळे विश्वासार्हता निर्माण केली तरच आव्हानांचा मुकाबला करता येईल, नवी पिढी वृत्तपत्रे वाचत नाही. अनेकांनी वृत्तपत्रे खरेदी करणे बंद केले आहे. समाजमाध्यमांवर तरूणांना माहितीचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. वाचकांची कमी संख्या हे मोठे आव्हान मराठी वृत्तपत्रांसमोर आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांनी लोकशिक्षणाकरीता वृत्तपत्रे सुरू केली. सरकार व जनता यातील दुवा ते बनले होते. त्यांच लेखनीमध्ये सरकारला हादरून टाकण्याचे सामथ्र्य होते. परंतु, आज मात्र माध्यमांमध्ये ते सामथ्र्य कमी होत चालले आहे. पत्रकारांचे राजकीय अंदाज चुकू लागले आहेत. त्यामुळे लोकांच्या विश्वासार्हतेला तडा जातो काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेचे आव्हान माध्यमांसमोर असलयाचे खांडेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात  ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भांड यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी कामगारनेते शंकर मोरे, गझलकार ए. के. शेख, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर आदी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्वागत संभारंभ  शंकर रहाणे यांनी केला.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष बिरवटकर, गझलकार शेख, कामगार नेते मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत साळके यांनी केले असून आभार विभव बिरवटकर यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रसाद केरकर, श्यामसुंदर सोन्नर, सखाराम कुलकर्णी, चारूदत्त चौधरी, डॉ. शीतल भालके आदींना पुरस्कार देण्यात आले.