Saturday, April 20 2019 12:00 am

सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविषयी राज्यातील युवा व महिलांचा यल्गार

खोपोली : हिंद मजदूर सभा – महाराष्ट्र कौन्सिल या केंद्रीय कामगार संघटनेचे “महिला व युवक राज्य अधिवेशन” दि: २४ व २५ फेब्रुवारी २०१८ रोजी तळेगाव दाभाडे येथे पार पडले. ह्या अधिवेशनाचे उदघाटन सोहळा दि: २४ फेब्रुवारी २०१८ रोजी अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस श्री हरभजन सिंग सिद्धू यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाचे आयोजन हिंद मजदूर सभेचे महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस श्री संजय वढावकर व खजिनदार श्री निवृत्ती धुमाळ यांनी केले होते. या संपूर्ण अधिवेशनाचे अध्यक्षपद श्री शंकर साळवी यांनी भूषवले. उदघाटन भाषणामध्ये श्री सिद्धू साहेबांनी सर्व युवा व महिलांना चांगले मार्गदर्शन करत म्हणाले की देशातील पुढील युवा व महिला कामगारांचा चळवळीत सहभाग खूप महत्वाचा असणार आहे. ते म्हणाले एकीकडे २०३० पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचे अश्या घोषणा सत्ताधारी करतात, तर दुसरीकडे मात्र करोडो तरुण नोकऱ्यांच्या शोधात आहेत. तरुणांना नोकऱ्या देणार हे मोदींचे निवडणुकीतील आश्वासन हवेतच विरले आहे. नोकऱ्या देणे तर दूरच, पण सरकार कामगारविरोधी आहे.सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि कामगार कायद्यात होऊ घातलेले बदल अश्या सध्याच्या कठीण परिस्थितीत तसेच महिला व युवकांचे कामाच्या ठिकाणी असलेल्या प्रश्नांची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे हिंद मजदूर सभा -महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री. संजय वढावकर यांनी सांगितले . ते पुढे असेही म्हणाले की सरकार महिलांच्या सुरक्षेबाबतदेखील कमी पडत आहे. आता तर चळवळी, आंदोलन दडपले जात आहेत आणि त्यांना देशद्रोही ठरवण्यात येत आहे. त्यावेळी राज्यातील हिंद मजदूर सभेचे गोदी कामगारांचे नेते ऍड एस. के. शेट्ये , एस. टी कामगारांचे नेते साथी हनुमंत ताटे , रेल्वे कामगारांचे नेते साथी जे. आर. भोसले , म्युनिसिपल, बेस्ट कामगारांचे नेते साथी शशांक राव व साथी शंकर साळवी उपस्थित होते.

ह्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व भागातून ७०० पेक्षा जास्त एस. टी , रेल्वे , गोदि व बंदर, म्युनिसिपल मजदूर, बेस्ट वर्कर्स, नर्सिंग स्टाफ, सेक्युरिटी प्रेस , जहाज उद्योग, माथाडी कामगार प्रतिनिधी व यांच्या बरोबरच अनेक असंघटीत कामगार प्रतिनिधी जसे अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, घरेलू कामगार, युवा व महिला उपस्थित होते. तसेच या अधिवेशनाच्या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिला व युवकांचे वेगवेगळे अधिवेशन झाले. त्यात पुढील ठराव करण्यात आले. ज्यामध्ये युवकांचे सरकारी व निमसरकारी केंद्रशासित व राज्यशासित सरकारी उद्योगातील रिक्त पदे भरणे, सरकारी उदयोगांचे खागजीकरण न करणे, असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे सौंरक्षण देऊन समावेशक छत्री कायदा व्हावा, कंत्राटी कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करून कंत्राटी कामगारांना कायम स्वरूपी करण्यासंबंधी, बेरोजगारांना कामे द्यावी व देता येत नसतील तर भात द्यावा , अंगणवाडी सेविका , घरेलू कामगार, अशा वर्कर्स आदी कामगारांना कामगारांचा दर्जा द्यावा, माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करून प्रभावी अंमलबजावणी , शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांना शासनाने जाहीर केलेले निर्णय व शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित उपायोजना करावी इत्यादी ठराव मांडून मंजूर करण्यात आले व त्यासाठी सरकार दरबारी ते मंजूर करण्यासाठी कार्यक्रम ठरविण्यात आला.तसेच महिलांच्या अधिवेशनात महिला आणि बजेट, महिला आणि सुरक्षा, महिला आणि आरोग्य, संघटित व असंघटित महिलांचे प्रश्न, लैंगिक छळ विरोधी समिती प्रभावी अंमलबाजवणी या संबंधी ठराव करण्यात आले.

अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी युवक समिती व महिला समितीचे गठन करण्यात आले. ज्यामध्ये युवा समितीमध्ये एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांची युवकअध्यक्षपदी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्सचे श्री सुहास जोशी यांची युवकसरचिटणीसपदी, मुंबई लेबर युनियनचे श्री किरण पवार यांची युवककार्याध्यक्ष पदी, तर बी पी टी एम्प्लॉयीस युनियनचे श्री खुराडे यांची युवकखजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच साथी राजेंद्र गिरी, साथी विकास मगदूम , साथी निवृत्ती धुमाळ यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.तसेच महिला विभागात म्युनिसिपल नर्सिंग स्टाफच्या साथी श्रीमती त्रिशिला कांबळे यांची महिला अध्यक्षपदी , एसटी कामगार संघटनेच्या साथी श्रीमती शीला नाईकवडे यांची महिला सरचिटणीस पदी, मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या साथी श्रीमती अनुराधा अंबिके यांची महिला कार्याध्यक्षपदी तर म्युनिसिपल मजदूर युनियनच्या श्रीमती रंजना आठवले यांची महिला खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच साथी श्रीमती कल्पना देसाई व साठी श्रीमती संज्योत वढावकर यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. अशी माहिती श्री निवृत्ती धुमाळ खजिनदार हिंद मजदूर सभा, यांनी दिली