Monday, April 6 2020 12:49 pm

सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप सानप यांचे दुःखद निधन

सफाळे: क्रिकेट खेळताना सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे घडली. संदीप वसंत सानप (३८, मूळ रा.चिंचोली, ता.सिन्नर) असे मृत पोलिसाचे नाव असून ते मूळचे नाशिकचे आहेत. त्यांच्या मृत्यूने नाशिकसह पालघर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०१९ पासून पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून संदीप सानप हे नियुक्त होते.

पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध पोलीस ठाण्यांच्या रायझींग डे चे आयोजन केले जात आहे. या सप्ताहामध्ये कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्ह्यासंबंधी माहिती देणे, पोलीस दैनंदिन कामकाज नागरिकांसमोर मांडणे, शस्त्र प्रदर्शन भरवणे, क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस ठाणेअंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात  क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. सामाना पालघर, केळवा, अर्नाळा, डहाणू, मोखाडासह १९ पोलीस ठाण्यांमध्ये होणार होता.

केळवा विरुद्ध सेफाळे पोलीस ठाण्यात क्रिकेट सामना झाला. सहायक पोलीस निरीक्षक सानप हे मैदानात खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना सुरुवातीला पोलिसांनी सफाळे रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.