Thursday, August 22 2019 3:43 am

सण माघी गणपतीचा

गणेश जयंती : गणेश जयंती हा सण महाराष्ट्र आणि गोवा मध्ये माघी गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. मराठी महिन्यातील माघ महिन्यात शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जयंती  साजरी केली जाते. यंदा ८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवामध्ये गणेश जयंती हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. गणेश जयंती हा दिवस तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणेशभक्त मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.

गणेश जयंती कधी साजरी करावी?

दाते पंचांगानुसार चतुर्थी 8 फेब्रुवारी 2019 दिवशी सकाळी 10.19 ते 9 फेब्रुवारी सकाळी 12.25 पर्यंत आहे. त्यामुळे 8 फेब्रुवारी दिवशी गणेश जयंतीचा उत्साह रंगणार आहे.

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची प्रथा आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे विसर्जन केले जाते. काही घरांमध्ये भाद्रपदाप्रमाणेच माघ गणेशोत्सवामध्येही गणपतीची मूर्ती घरी आणली जाते.गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्यामुळे यादिवशी गणपतीला तीळापासून बनवलेल्या पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो. यादिवशी तीळाच्या पेस्टने स्नान केले जाते.

गणेश जयंती दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो. त्यासोबतच तीळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवला जातो. गणेशभक्त गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. मुंबईमध्ये सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो खास मिरवणूक काढली जाते. तसेच गणपतीपुळे, मोरेश्वर येथील गणेश मंदिरात खास उत्सव असतो.