Monday, April 21 2025 10:44 am
latest

संविधाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी यांचे व्याख्यान

अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

ठाणे 21 : भारतीय संविधानाला ७४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी यांचे ‘संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक भुषविणार आहेत. हे व्याख्यान, शनिवार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता ही डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. हे व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे. व्याख्यानमालेचे हे बारावे पुष्प आहे.

गेल्या महिन्यात, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच, पुढील महिन्यात, २६ जानेवारी रोजी संविधानास ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संविधानाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्याते – न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी यांनी १९८३ ते २००३ या काळात मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. नोव्हेंबर २००३मध्ये त्यांची अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. फेब्रुवारी २०२२मध्ये ते न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाले. सध्या ते घटना तसेच, नागरी कायद्याशी निगडित विषयांवर मार्गदर्शन आणि वृत्तपत्रीय लिखाण करतात. तसेच, कुष्ठरोग निर्मूलन समिती, पनवेल या संस्थेचे ते विश्वस्त असून शिक्षण, आरोग्य, गांधीवादी विचारासाठी काम करणाऱ्या संस्थांशी निगडित आहेत.

अध्यक्ष – न्यायमूर्ती अभय ओक

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी १९८३ ते २००३ या काळात प्रथम ठाणे जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. ऑगस्ट २००३मध्ये ते अतिरिक्त न्यायमूर्ती झाले. तर, नोव्हेंबर २००५मध्ये ते कायम न्यायमूर्ती झाले. २०१७मध्ये त्यांची कर्नाकट उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. तर, ऑगस्ट २०२१मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.

विचारमंथन व्याख्यानमाला

ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे अकरावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले आहे. आजवर या व्याख्यानमालेत डॉ. अनिल काकोडकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. बाबा भांड, श्री. हरी नरके, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. रमेश जाधव, डॉ. सदानंद मोरे, श्री. श्रीकांत बोजेवार यांनी महनीय व्यक्तिमत्वांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारी व्याख्याने दिली आहेत.