Friday, May 24 2019 6:43 am

संयुक्त राष्ट्र सभेत भारताचा मोठा विजय; INCB सदस्यपदी भारताच्या जगजित पोवाडीया यांची फेरनिवड

नवी दिल्ली :  इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या ( INCB) सदस्यपदी भारताच्या जगजित पोवाडीया यांची फेरनिवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रासभेत आज झालेल्या निवडणुकीमध्ये पोवाडीया यांना ५४ पैकी ४४ मते पडली. पोवाडीया या २०१५ पासून आयएनसीबीच्या सदस्यपदावर असून फेरनिवडीमुळे त्या २०२५ पर्यंत या पदावर सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. हा संयुक्त राष्ट्रासभेत भारताचा मोठा विजय मानला जात आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या ५४ सदस्यांनी आज गुप्त मतदान केले. या निवडणुकीतील पाच जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक जिंकण्यासाठी २८ मतांची आवश्यकता असते. ५४ सदस्यांपैकी ४४ सदस्यांनी पोवाडिया यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले आहे. हा भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान , संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी पोवाडीया यांचे अभिनंदन केले आहे.