ठाणे, 15 – श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरीत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित ठरतोय तरी, आपण अनभिज्ञ असुन आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा, “श्वासागणिक धोका…वेळीच ओळखा” ! असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ञ डॉ. अनिल मडके यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प डॉ.अनिल मडके यांनी गुंफले. याप्रसंगी व्यासपिठावर या सत्राचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आ.निरंजन डावखरे आणि प्रा. किर्ती आगाशे उपस्थित होत्या.आ.डावखरे यांनी अशा प्रकारच्या वैचारिक बैठकीतील विविधांगी व्याख्यानाद्वारे गेली ३८ वर्षे प्रबोधन केले जात असल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.तर, प्रास्तविकात डॉ.महेश जोशी यांनी, कोविड आल्यानंतरच सर्वाना श्वासाचे महत्व पटल्याचे सांगितले.
व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉ. अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.तसेच अनेक जागतिक संदर्भ देत, अग्नीचा शोध लागल्यावर पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायु प्रदुषणाचा परिणाम जाणवु लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. यात निसर्ग अतिरेकी नाही तर माणुस अतिरिकी आहे. हवा प्रदुषणाला १० टक्के निसर्ग, तर ९० टक्के माणुस जबाबदार आहे. तेव्हा, वायु प्रदुषणाच्या धोक्यांवर आज जगभर चर्चा होत आहेत मात्र आपण आजही दुर आहोत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना त्यांनी, आपल्या जगण्यात श्वसन एवढे महत्त्वाचे असताना आपण त्याबद्दल संवदेशनील, जागरुक नाही. श्र्वास म्हणजे वारा ही देवाने फुकट दिलेली गोष्ट आहे. सारासार विचार करता प्रत्येक माणूस एका मिनिटाला १२ वेळा श्वास घेतो तर दिवसाला सरासरी दहा हजार लिटर हवा फुप्फुसात घेतो व तेवढीच बाहेर सोडतो.आपली जीवनशैली, अगदी रोजचा स्वयंपाक, वाहन चालवणे, औद्योगिक क्षेत्रातील कामे, शेतात वापरली जाणारी किटकनाशके, डासांसाठी वापरले जाणारे मॉस्किटो रिपेलंट अशा अगणिक बाबीमुळे हवेचे प्रदूषण होत आहे. दुर्दैवाने हीच प्रदूषित हवा आपल्या अनारोग्यास मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे. शहरांमध्ये जागा तेवढीच आहे आणि लोकसंख्या वाढत आहे. गेल्या चार दशकांमध्ये तापमान वाढल्याने ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे.२०२२ पर्यत कार्बन डायऑक्साइड वाढला आहे. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.५ टन आहे. त्यामुळे वेदर (हवामान) नव्हे तर क्लायमेट (वातावरण) सुधारले पाहीजे. असे नमुद करून डॉ. मडके यांनी, प्रदुषणात दिल्ली पाठोपाठ मुंबई असुन हवा प्रदुषणामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.तेव्हा, हवा प्रदूषणाचे हे संकट थेट आपल्या श्वासाशी संबंधित असल्याने वेळीच जागे होऊन निर्सगाला जपा. असे आर्जव डॉ. मडके यांनी केले. व्याख्यानाचा समारोप डॉ. मनाली खरे यांनी वंदे मातरम गीताने केला.