Thursday, June 20 2019 3:24 pm

श्री शनैश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मान्यता 

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यासह आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्यास देखील मंजुरी देण्यात आली.
           श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. गर्दीच्या प्रमाणात याठिकाणी सोयी-सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्यक होते. तसेच यापूर्वीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराबाबत तसेच सध्या नव्याने नियुक्त विश्वस्तमंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत शासनास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही याठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे अस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमान्वये शनैश्वर देवस्थान राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
           नवीन कायद्यामुळे श्री शनैश्वर देवतेच्या धार्मिक प्रथा व परंपरा जपून दर्शनव्यवस्थेबाबत भेदभाव नष्ट करून एकसंघता आणता येणार आहे. तसेच भाविकांनी देवतेच्या चरणी दान केलेल्या निधीतून भक्तांसाठी अधिक व्यापक सोयी-सुविधा निर्माण करण्यासह अतिरिक्त निधीतून समाजोपयोगी शैक्षणिक व वैद्यकीय कार्य करता येईल. या कायद्यानुसार नवीन विश्वस्तमंडळ नियुक्त करणे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य शासनाकडे राहतील.