मुंबई,30 : श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्व शाळांमध्ये पाचवी ते दहावी या वर्गाकरिता श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित १५ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरिता निंबध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंत्रालयात श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्माण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला व्यवस्थापन समितीचे सदस्य ललीत गांधी, पवन संघवी, संदीप भंडारी, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे शिक्षण निरीक्षक भक्ती गोरे उपस्थित होत्या.
कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रदर्शने, जिल्हास्तरावर व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ, माहितीपटाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शालेय, तालुका व जिल्हास्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत खासगी, सरकारी, अनुदानीत व विनाअनुदानित अशा सर्व शाळांना या स्पर्धेबाबत माहिती होईल यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविणे, स्पर्धांचे आयोजन करणे, जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचे गठन करणे, स्पर्धेचा निकाल घोषित करणे, स्पर्धेच्या निकालाची माहिती शासनास सादर करणे यासह या कार्यक्रमांबाबत विविध माहिती सादर करण्याची कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे निर्देश श्री.लोढा यांनी समितीला दिले.