Sunday, September 15 2019 11:06 am

श्री क्षेत्र जेजुरी गडावर ‘आम्रपुजा’ साजरी

जेजुरी – दरवर्षी  वैशाख महिन्यातील पहिल्या रविवारी अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामी खंडोबाच्या सेवेतील वंश परंपरागत सेवेतील पुजारी गुरव, वीर, कोळी, घडशी समाजाच्या वतीने जेजुरीगड मंदिरामध्ये आम्रपुजा केली जाते.वैखाख महिन्याच्या सुरुवातीस दि.०५ मे रोजी प्रतिपदेची प्रक्षालन पूजा सकाळी करण्यात आली.वसंत ऋतूमध्ये आंब्याचा बहर चोहीकडे पसरलेला असताना श्रीखंडेराया चरणी दरवर्षी आम्रपूजा केली जाते.  त्यानंतर धूपारतीचे वेळी रुद्राभिषेक आवर्तन, पंचामृत पूजा, उसाच्या रसाचे स्नान आणि त्यानंतर आमरसाचा अभिषेक श्रीखंडोबा म्हाळसा देवीच्या स्वयंभू लिंगावर करण्यात आला. त्यानंतर सुगंधित जलस्नान, चंदन उटी लेपन करण्यात आली. संपूर्ण गाभाऱ्यामध्ये खास हापूस आंब्याची सजावट करण्यात आली, मूर्तींना आंब्याचे हार तयार करून घालण्यात आले. मल्हारी मार्तंडाची करुणाष्टके म्हंटली गेली आणि सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्ये पूजा संपन्न झाली.यापूजेमध्ये समस्त गुरव, वीर, कोळी, घडशी समाजाच्या तरुणांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. सायंकाळी शेजारातीचे वेळी आम्रपूजेचे उद्यापन करून भाविकांना आंब्याचा प्रसाद वाटला.