ठाणे 10 प्रभु श्रीराम हे मानवतावादाचे दुसरे नाव आहे. श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक असल्याने प्रत्येकाने आपल्या परंपरा, संस्कृतीवर गर्व करून एकजुटीने कर्तव्याचे पालन करीत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत बनवावे. हीच राष्ट्रपूजा असुन तीच श्रीराम पुजा आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवारी रात्री (दि.९ जाने.) सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी “श्रीराम पूजा ते राष्ट्र पूजा “या विषयावर त्यांनी आपले जाज्वल्य विचार मांडले. याप्रसंगी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि सचिव शरद पुरोहीत व्यासपीठावर उपस्थित होते. तर, श्रोत्यांमध्ये, मा.उपमहापौर सुभाष काळे,मा.गटनेते मनोहर डुंबरे, मकरंद मुळे, मा. नगरसेविका प्रतिभा मढवी,डॉ.राजेश मढवी, विद्याधर वैशंपायन, सीताराम राणे, प्रा.किर्ती आगाशे, समतोलचे विजय जाधव आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अयोध्येतील श्रीराम पुजेचे सुत्र घेऊन मंत्री अनुराग ठाकुर यांनी राष्ट्र पूजेबाबत विवेचन केले. प्रभु श्रीराम हे मानवतावादाचे दुसरे नाव आहे. जिथे जिथे चांगले काम तिथे तिथे रामनाम, रामपुजा आपल्यातील आत्म्याचा दिप उजळवत आहे. भारत आज अमृत काळातुन सुवर्णकाळात जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले असुन आगामी काळात विकसित भारताचा संकल्प तडीस जावुन ‘भारत’ जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. असा विश्वास व्यक्त केला. आत्मनिर्भर बनणे हीच राष्ट्रपुजा आहे.देशाच्या विकासासाठी केलेले प्रत्येक काम ही राष्ट्र पूजा असुन तीच रामपूजा आहे. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात कोठारी बंधु’ तसेच गुप्ता या तरुणाने बलिदान दिले. आज काही लोक म्हणतात, राम ही केवळ कल्पना आहे. सागरी सेतु काल्पनिक आहे. अनेक राजकिय मंडळीही आहेत ज्यांच्या नावात ‘राम’ आहे, तरीही रामाला विरोध करतात, सनातनचा विरोध करतात. मुघल आणि इंग्रज सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आले पण त्यांचीच पाळेमुळे मुळापासुन उखडली गेली. भारत एक सनातन राष्ट्र असुन यापुढेही सदैव सनातन राहणार असल्याचे मंत्री ठाकुर यांनी ठणकावले.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि पंडीत नेहरू यांच्यात स्वदेशी विचारधारेचा अभाव होता, ते पाश्चिमात्य दृष्टीकोन आणि विचारधारेतुन मुस्लिम तुष्टीकरणाचे काम करीत होते. काँग्रेस काळात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख करून त्यांनी, काँगेसने सीमेवरील जवानांसाठी १० वर्षात केले नाही ते मेक इन इंडिया बुलेटप्रुफ जॅकेट मोदी सरकारने केले. रामभक्त मोदींमुळेच कोविड काळात लस बनली. देशातील नागरीकाना मोफत लस दिली किंबहुना, जगातील १५७ देशांनाही कोविड लस भारताने दिली. त्याचबरोबर ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले पुढची पाच वर्षे मोफत धान्य देण्याची गॅरंटीही मोदींनी दिली आहे. एकीकडे संपूर्ण जगात हिंसा होत असताना भारत मात्र, “वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेतून चालला आहे. हीच खरी राष्ट्रपूजा असल्याचे मंत्री ठाकुर यांनी, आवर्जुन नमुद करून राष्ट्रपुजा करीत राहा, आपसुकच आपणाकडुन रामपुजा घडत राहील. असे सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ते नरेंद्र मोदी या प्रभुतीमुळेच भारत सशक्त बनत गेला. कोरोना काळात तर राम मंदिर, नविन संसद, कर्तव्य पथ, सोमनाथ धाम, केदार धाम आणि अयोध्या धामच्या उभारणीची सुरुवात झाली. तिहेरी तलाक,राम मंदिर, कलम ३७०, ३५ अ असो वा अन्य वचने पूर्ण करून भाजपने एकप्रकारे राष्ट्रपूजा केली. म्हणजेच रामपुजा केली. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत आता परमाणु शक्तीशाली बनला आहे. काश्मिरच्या गल्ली गल्लीत तिरंगा फडकत आहे.जगातील मोठमोठे देश भारताकडे डोळे लावुन बसले आहेत. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील आणि पुढील काळात भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
व्याख्यानाच्या प्रारंभी प्रकाश बापट लिखित मोरया प्रकाशनचे “राम मंदिर अयोध्येचे – केंद्र विश्व चैतन्याचे” या पुस्तकाचे चौथ्यांदा लोकार्पण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन विष्णु रानडे यांनी तर व्याख्यानाचा समारोप प्रा. किर्ती आगाशे यांनी वंदे मातरम गीताने केला.
सांस्कृतिक चळवळीची ३८ वर्षे
ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजनाचा यज्ञ असलेल्या कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे हे ३८ वे वर्ष आहे. आजचे हे २६० वे व्याख्यान असल्याचे प्रास्तविकात नमुद करून आ. संजय केळकर यांनी, त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडीत सुरु असलेल्या ह्या सांस्कृतिक चळवळीच्या प्रारंभ पासुनचा आढावा घेऊन अनेक आठवणी वृद्धींगत केल्या.