Saturday, January 18 2025 7:17 am
latest

श्यामसुंदर अग्रवाल याच्यावर दाखल गुन्हे आणि तक्रारींची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 03 : मीरा भाईंदर येथील श्यामसुंदर अग्रवाल याच्याविरुद्ध असलेले गुन्हे आणि तक्रारींची दखल घेऊन याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अपर पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येईल आणि तीन महिन्यांत याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सदस्य प्रशांत बंब यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मीरा-भाईंदर शहरातील शामसुंदर अग्रवाल याच्यावर मीरा-भाईंदर आयुक्तालय, बृहन्मुंबई आयुक्तालय, ठाणे आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात 32 गुन्हे दाखल आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे, जमिनींची खोटी कागदपत्रे बनवणे, खोट्या सह्या करणे, खोटी सरकारी कागदपत्रे बनवून शासनाचा महसूल बुडवल्याबद्दलचे हे विविध गुन्हे आहेत. या आरोपीवर मोका लावण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

मीरा-भाईंदर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारे भूमाफिया तयार झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.यावेळी सदस्य संजय सावकारे, किशोर जोरगेवार यांनीही चर्चेत भाग घेतला.