मुंबई 30 : शेतकऱ्यांनी शेतीविषयक विचार बदलले पाहिजेत. शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे, तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), कृषी विभाग, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागिदारी बैठक -२०२४ सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (MITRA) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृषी उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशातील महत्त्वपूर्ण कंपन्यांसोबत करार करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळेल.
कृषी विभागामार्फत कृषी उत्पादनांची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सर्व मदत देण्यात येईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा एक ट्रिलियन राहणार आहे. त्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा सात टक्के आहे तो आता सोळा टक्के करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.
कॉर्पोरेट खरेदीदार आणि किरकोळ विक्रेत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मार्ग तयार करणे, बाजाराच्या गरजा, गुणवत्ता मानके आणि खरेदी प्रक्रियांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सोळा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
आजच्या कृषी मूल्य साखळी बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्ये, सोयाबीन, फळे, भाजीपाला आदी शेतकरी उत्पादक ५९ कंपन्या सहभागी झाल्या. या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून ४२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कोका-कोला, पेप्सिको, ओएनडीसी, जैन इरिगेशन, ईटीजी ग्रुप, एडीएम इंडिया, मॅरिको, टाटा केमिकल्स, टाटा रॅलिस, आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था तसेच वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, नाबार्ड, नबकिसान फायनान्स लिमिटेड, सिडबी, आणि आयडीबीआय बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे TCS, सह्याद्री फार्म्स, मित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्यात सामंजस्य करार झाले.