Thursday, August 22 2019 4:33 am

शेतकऱ्यांसाठी खांद्याला खांदा लावून मदत करू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिर्डी : महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट आहे. राज्य सरकार त्यावर मात करण्याचा प्रयत्नात आहेच, पण काही मदत लागलीच तर महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार उभा राहील असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतून केंद्र सरकार  मदत करेल,अशी घोषणा मोदींनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली .
             साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण झाल्याने शिर्डीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोहळ्याचा समारोप करण्यात आला .पंतप्रधान मोदी शिर्डीत साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी आले तरी इतर भाविकांनाही दर्शन दिले जाईल, असे शिर्डी संस्थानने स्पष्ट केले होते. मात्र त्यात ते खरे उतरताना दिसले नाही. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आज लाखो भाविकांनी सकाळपासूनच शिर्डीत गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून चक्क या भाविकांना साईबाबांचे दर्शन काही तासांसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे मंदिर प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाली होती. या सर्व प्रकारामुळे साई भक्तांमध्ये नाराजी पसरली होती. काही साईभक्त तर मंदिरावरील कलशाचे दर्शन घेऊन माघारी फिरले.
             दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना चावी वाटपासह अनेक विकासकामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच मराठीतून करत शिर्डीत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत राज्य सरकारच्या कामांचेही कौतुक केले. . घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचाही पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. घर देण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले. अनेक योजना होत्या. मात्र, गरिबांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचा उदोउदो करण्याचा हेतू त्यामागे होता, व्होट बँक तयार करण्याचा उद्देश होता, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली.