Friday, November 22 2019 7:57 am
ताजी बातमी

शेतकऱ्यांवर संकटाची बरसात, तर रोहित पवारांवर लाखोंच्या गुलालाची….

मुंबई :  वयाच्या ऐंशीतही शरद पवार राज्यभर पावसात भिजून निवडणुकीत लढा देत तर निवडणुकीनंतर देखील ओला दुष्काळामुळे पाहणी दौरा करत आहेत आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र आपल्या विजयाची गुलाल उधळत मिरवणूक काढत आहेत.अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. संपूर्ण पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. काल सातारा दौरा केल्यानंतर आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. तिथे शेतकऱ्यांच्या भेटीगाठी करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर दुसरीकडे नातू रोहित पवारांची मात्र जामखेडमध्ये विजयी मिरवणूक झाली. यावेळी ढोल-ताशांचा गजरात 30 जेसीबी लावून गुलालाची उधळण करण्यात आली.  नवनिर्वाचित आमदारांना ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असा सल्ला शरद पवारांनी निकालानंतर दिला होता. या सल्ल्याचा विसर पवारांचे नातू रोहित पवारांनाच पडलेला दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने गुलाल उधळून रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. निवडून आल्यानंतर रोहित पवार आज पहिल्यांदा जामखेड शहरात आले होते. जनतेचं आभार मानण्यासाठी या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
गेल्या 30 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्या लढत झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 43 हजार मतांनी पराभव केला. बऱ्याच वर्षांनी या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार झाल्याने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.

राज्यात इतका सत्तासंघर्ष सुरु असताना शरद पवार मात्र थेट बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांचे डोळे पुसले. उद्ध्वस्त शिवारांची पाहणी केली. त्याचवेळी त्यांचे नातू रोहित पवार गुलालात माखले होते.