Saturday, July 11 2020 9:24 am

शेकडो बेरोजगार तरुणांनी पाठवला पंतप्रधानांना बायोडाटा नरेंद्र मोदी हे डरपोक पंतप्रधान- आ. आव्हाड

ठाणे-: सन 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्या प्रत्येक भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रति वर्षाला 2 कोटी बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजरोजीपर्यंत 6.60 कोटी तरुण बेरोजगार असल्याचे चित्र संपूर्ण भारतात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शेकडो तरुण-तरुणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभाग निरीक्षक सुरज चव्हाण, ठाणे शहर युवक अध्यक्ष मोहसीन शेख, ठाणे शहर युवती अध्यक्षा प्रियांका सोनार यांच्या नेतृत्वाखाली आपले बायोडाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. दरम्यान, बेरोजगारीची आकडेवारी उघडकीस येईल म्हणून तो अहवालच दडपण्याचे आदेश या मोदींनी दिलेले आहेत. यावरुन मोदी हे किती डरपोक पंतप्रधान आहेत, हेच सिद्ध होत आहे. अशी टीका आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने  आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हेे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींनी आपले बायोडाटा, आपल्या पदव्यांचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे एका लिफाफ्यामध्ये टाकून ते ‘7 रेसकोर्स , नवी दिल्ली, या पत्यावर स्पीड पोस्टने पाठवले. विशेष म्हणजे, या वेळी एका 56 वर्षाच्या महिलेनेही मोदी सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त करीत, मुलाला नोकरी मिळत नाही; पती आजारी आहेत. मीही या रांगेत उभी राहू का? अशी विचारणा करीत भाजप सरकारला लाखोली वाहिली.
यावेळी, मोदीजी सांगा हो, कुठे गेल्या दोन कोटी नोकर्‍या हाती आल्या फक्त बेरोजगारीच्या टोकर्‍या बेजार करेतही ही बेरोजगारी खिशात नाही दमडी अन् घरी आई आजारी अंबानीला दिलं त्याच्या एक टक्का तरी आम्हाला द्या,
नाहीतर म्हणाला होतात; तसेच फकिरासारखा पश्चाताप करा, अशी एका बेरोजगार तरुणाची कविता ऐकवून आ. जितेंद्र आव्हाड यांनी, “ दोन कोटी नोकर्‍यांचा तुम्ही जुमला केला होता. पाच वर्षे संपायला आली. त्या प्रमाणे 10 कोटी नाोकर्‍या मिळायला हव्या होत्या. बेरोजगारीचा आलेख सर्वात उंचावर म्हणजेच हिमालयाच्या उंचावर गेलेला आहे. 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच हा उच्चांक गाठला आहे. एवढा उच्चांक कधीच कोणी गाठलेला नव्हता. तो मोदींनी पराक्रम केलेला आहे. बेरोजगारीची सरासरी आजच्या तारखेला एका वर्षाची संख्या काढली तर 6. 8 टक्के एवढी आहे. ही बेरोजगारी सरकारला कमी करायची नाही. या बेरोजगार तरुणांना हाताशी धरुन धार्मिक विद्वेष या सरकारला निर्माण करायचा आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील उद्रेक दाखवण्यासाठी ही मुले आपला बायोडाटा मोदींना पाठवत आहेत. जनता एरवी शांत असते. पण, जर जनता संतापली तर मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो, हे सरकारला अद्यापही समजलेले नाही”.
बेरोजगारीची आकडेवारी उघडकीस येईल म्हणून तो अहवालच दडपण्याचे आदेश या मोदींनी दिलेले आहेत. यावरुन मोदी हे किती डरपोक पंतप्रधान आहेत, हेच सिद्ध होत आहे.  56 इंचाची छाती असलेल्या मोदी यांची छाती ही 5.6 सेमीचीच आहे, हे स्पष्ट झालेले आहे. दिलेले आश्वासन न पाळल्यास माफी मागण्याची परंपरा या देशाची आहे. पण, तेही मोदींना समजत नाही, अशी टीका यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
या आंदोलनात युवती पदाधिकारी पल्लवी सातपूते, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, विजय भामरे, महेंद्र पवार, शहर कार्यकारिणी सदस्य सुरेश सिंग, सचिन पंधारे, संतोष सहस्त्रबुद्धे, ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे, ब्लॉक कार्याध्यक्ष प्रफुल कांबळे, वॉर्ड अध्यक्ष फिरोज पठाण, केतन जेधे, संतोष बालगुडे, भोला गिरी, डॉ. अखिलेश मिश्रा, युवक पदाधिकारी जावेद शेख, संदेश पाटील, राहुल सिंग, प्रमोद कांबळे, दिपक बालगुडे, ठाणे शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, आदी कार्यकत्यार्ंंसह ठाणे शहर, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदी भागातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.