Saturday, August 24 2019 11:16 pm

शिवसेनेचाच सभापती होणार…

ठाणे : भाजपची मदत न घेता स्थायी समिती आपल्याकडे खेचून आणण्याची शिवसेनेची खेळी यशस्वी झाली असून शिवसेनेचाच सभापती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी कोकण आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत शिवसेनेने सर्वसाधारण सभेचे अधिकार वापरून स्थायी समिती सदस्यांची निवड केली आहे . त्यामुळे शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा  एक असे नऊ सदस्य समितीवर निवडणून गेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण असे आघाडीचे चार सदस्य आणि भाजपचे तीन अशा १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे . स्थायी समिती आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या भांडणाचा फायदा मात्र काँग्रेसला झाला असून संख्याबळानुसार काँग्रेसचा एकच सदस्य निवडणून जाणार असताना शिवसेनेच्या गोटातुन यासीन कुरेशी आणि राष्ट्रवादीच्या गोटातून विक्रांत चव्हाण यांनी वर्णी लागली आहे . या बेकायदा निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .
स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यासाठी आज महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या संख्याबळानुसार स्थायी समितीवर शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादीचे पाच आणि भाजपाचे तीनसदस्य निवडले जाणार होते. परंतु या आदेशाला तिलांजली देत सत्ताधारी शिवसेनेने सर्वसाधारण सभेच्या अधिकाराचा वापर करून हि निवडणूक घेतली . त्यामुळे शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा एक अशी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली तर राष्ट्रवादीने पाच सदस्यांची नावे दिली असताना त्यांचे केवळ चार सदस्य निवडणून गेले . अशा पद्धतीने निवड घेण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी विरोध केला . मात्र हा विरोध डावलून  प्रभारी पिठासीन अधिकारी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नावांची घोषणा केली. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या संख्याबळाला शिवसेनेने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचा निकाल अजूनही लागला नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेली सभाच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनते दिलीप बारटक्कके आणि स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी केला. तर मागील स्थायी समिती सदस्यांची निवड जर बेकायदेशीर असेल तर झालेले कामकाज कायदेशीर होते का असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी उपस्थित करून स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीला आक्षेप घेतला. सभागृहनेते नरेश म्हस्के यांनीही महासभेला असलेल्या अधिकाराचा वापर करण्याची सूचना सभागृहाला केली. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी शिवसेनेच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. त्यांचा विरोध डावलून अखेर सत्ताधारी शिवसेनेेने स्थायी समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे 16 सदस्यांच्या स्थायी समितीवर शिवसेनेचे नऊ, राष्ट्रवादीचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य नियुक्त करण्यात आल्याने ठामपा तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात सत्ताधारी सेना यशस्वी झाली आहे.
या खेळीमुळे भाजपालाही सत्तेपासून दूर ठेवण्यात सेनेला यश आले आहे. स्थायी समितीच्या या भांडणात महापालिकेत अवघे तीन सदस्यांचे बळ असणार्‍या काँग्रेसचा मात्र फार मोठा फायदा झाला आहे. सनेने त्यांच्या कोट्यातून यासिन कुरेशी आणि राष्ट्रवादीने विक्रांत चव्हाण या दोन काँगे्रसच्या सदस्यांना स्थायी समितीचे दार उघडे केले आहे. ज्या पक्षाला संख्याबळानुसार एकही जागा मिळू शकत नव्हती त्याला दोन जागा मिळवण्यात यश आले आहे. महापालिकेत शिवसेनेचे 67, राष्ट्रवादी 36, भाजपा 23, काँग्रेस तीन आणि एमआयएम दोन असे संख्याबळ आहे. संख्याबळानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी विविध समितीवरील सदस्यांची संख्या निश्‍चित केली आहे. परंतु सत्ताधारी सेनेला ते मान्य नाही असे राष्ट्रवादीचे जगदाळे म्हणाले. राज्यात आणि केंद्रात तसेच इतर स्थानिक स्वराज्य  संस्थांमध्ये भाजपाबरोबर युती करून त्यांना सत्तेत भागीदारी देण्यात आली आहे. परंतु ठामपात भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसची मदत घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने सत्तेच्या जोरावर बेकायदेशीपणे सदस्यांची निवड केली आहे. त्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे आमचे लक्ष असून या निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी जाहीर केले आहे. तर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी सांगितले.

भाजपने दिले नवे चेहरे –
भाजपच्या गोटातून तीन सदस्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये आधीच्या नारायण पवार,मुकेश मोकाशी आणि मनोहर डुंबरे यांच्या ऐवजी भरत चव्हाण, कृष्णा पाटील आणि नम्रता कोळी यांची वर्णी लावण्यात आली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाजीब मुल्लांच्या  ऐवजी हणमंत जगदाळे –
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सिराज डोंगरे आणि अशरफ पठाण यांना कायम ठेवत नजीब मुल्ला यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांची नियुक्ती केली आहे .

शिवसेनेचे जुनेच सदस्य कायम –
शिवसेनेने मात्र कोणत्याही प्रकारचे बदल केले नसून गेल्या वर्षी ज्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याच सदस्यांना कायम ठेवले आहे . यामध्ये शिवसेनेकडून नरेश मणेरा, राम रेपाळे,नरेश म्हस्के,विमल भोईर,मालती पाटील, संजय भोईर,शैलेश पाटील,गुरमीत सिंह असे शिवसेने आठ आणि काँग्रेसचे यासिन कुरेशी असे नऊ सदस्यांची वर्णी लागली असल्याने शिवसेनेचाच सभापती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे .

विशेष समित्यांवर देखील शिवसेनेचे वर्चस्व कायम –
महिला व बालकल्याण समितीवर शिवसेनेच्या राधिका फाटक, विजया लासे, अंकिता पाटील, जयश्री डेव्हीड आणि निशा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलिच्छ वस्ती निर्मुलन समितीवर पूजा करसुळे, मंगल कळंबे, भूषण भोईर, गणेश कांबळे, प्रियंका पाटील आणि सुनील हंडारे यांची निवड करण्यात आली आहे. आरोग्य परीक्षण आणि वैद्यकीय सहाय्यक समितीवर नम्रता घरत, पल्लवी कदम, शिल्पा वाघ, नम्रता फाटक आणि साधना जोशी यांची वर्णी लागली आहे. शिक्षण समितीवर विकास रेपाळे, योगेश जानकर, नंदिनी विचारे, रुचिता मोरे आणि मनिषा कांबळे यांना पाठवण्यात आले आहे. तर क्रीडा समाजकल्याण आणि सांस्कृतिक कार्यक्रम समितीवर दिपक वेतकर, अमर पाटील, अशोक वैती, देवराम भोईर आणि सुधीर कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीलाही राष्ट्रवादीने विरोध केला होता. परंतु त्यांचा विरोध सत्ताधार्‍यांनी डावलून ही नियुक्ती केली.