Tuesday, July 14 2020 1:06 pm
ताजी बातमी

शिवसेना नगरसेवकाला खोट्या गुह्यात अडकविणे भाजपा कार्यकर्त्यांना पडले महागात

ठाणे – राजकीय पूर्ववैमन्यासातून वारंवार शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांना अडचणीत आणणे, प्रतिमा मलिन करणे, विकासकामात खोडा घालण्याचा प्रकार गेली अनेक वर्षे भाजपा कार्यकर्ता सागर मटकरी हा त्याच्या साथिदारांसह करत होता. स्वत:वर धारधार शस्त्रास्त्राने प्राणघातक हल्ला  करत हा हल्ला विकास रेपाळे यांनी केल्याचा बनाव करत त्याने पुंभाड रचले होते. या संदर्भात विकास रेपाळे यांनी ठाणे सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायलयाने विकास रेपाळे यांच्या बाजूने निकाल देत सागर मेटकरीसह 9 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून विकास रेपाळे आणि प्रत्यक्षदर्शींचा नुकताच जबाब नोंदवून घेतला आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना नगरसेवक म्हणून विकास रेपाळे हे आपल्या प्रभाग क्रमांक 19 चे  नेतृत्व करीत आहेत. राजकीय वैमन्यासातून याच प्रभागातील भाजपा कार्यकर्ता सागर मेटकरी हा वारंवार खोटेनाटे कारस्थान रचत आपल्या साथिदारांसह विकास रेपाळे कसे अडचणीत येतील याचा कट रचत आहे. तसेच सोशल मीडियाचा माध्यमातून विकास रेपाळे यांची बदनामी करत आहे.
24 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 11.30 वाजता सागर मेटकरी आणि त्याच्या साथिदारांनी एक षडयंत्र रचले. कशिश पार्प येथे नवरात्रोत्सवा दरम्यान सागर  मेटकरी याने येथे उपस्थित दोघा जणांना शिव्या देण्यास सुरुवात केली. तसेच विकास रेपाळे यांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर विकास रेपाळे यांच्या घराखाली येऊन विकास रेपाळे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ केली. त्यानंतर तिथून ते पसार झाले. त्यानंतर काहीवेळाने सागर मेटकरी हा जखमी अवस्थेत आपल्या साथिदारांसह पोलीस स्टेशनला हजर झाला. आपल्यावर विकास रेपाळे यांच्या सांगण्यावरुन हलल झाल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार केली. ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱयांनी, नेत्यांनीही कोणतीही शहानिशा न करता या संदर्भात एका शिष्टमंडळाद्वारे पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन सादर केले होते.
मात्र आपला या घटनेशी काही संबंध नसल्याचे तसेच त्या दिवशी आपण ठाण्याच्या बाहेर असल्याचे विकास रेपाळे यांनी पुराव्यानिशी सिध्द केले. त्यांनतर खोटे आरोप आणि खोट्या गुह्यात नेहमीच अडकविण्याचा प्रयत्न करणाऱया सागर मेटकरी याला धडा शिकविण्याचे विकास रेपाळे यांनी ठरविले. मेटकरी याने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली याचिका देखिल कोर्टाने फेटाळलेली आहे.
विकास रेपाळे यांनी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ठाणे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. खोट्या गुन्ह्यात अडकविणे, बदनामी करणे, माध्यमांना चुकीची माहिती देणे, फसवणूक करणे, खंडणी मागणे अशा बाबी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. न्यायालयाला त्यात तथ्य आढळल्याने न्यायलयाच्या आदेशानंतर 21 जून 2019 रोजी सागर मेटकरी आणि त्याचे आठ साथीदार समित आंबेरकर, ओमकार बेल्हेकर, प्रशांत जाधव, शांताराम कोळंबकर, रोहीत जाधव, योगेश सदावर्ते, धनंजय कावले, डॉ. दिलीप उशीर यांच्याविरुध्द भादंवि कलम 323, 354, 388, 420, 500, 504, 506 (2), 120 (ब)  प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली दोन महिने तपास केल्यानंतर नगरसेवक विकास रेपाळे आणि प्रत्यक्षदर्शी यांना जबाब नोंदविण्याची प्रक्रीया नुकतीच पार पडली. पोलीसांचा तपास पुर्ण झाला असून आरापींना कडक शासन होईल अशी अपेक्षा विकास रेपाळे यांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक श्री. गायकवाड करीत आहेत.