Tuesday, July 14 2020 11:58 am
ताजी बातमी

शिवसेना नगरसेवकांच्या कलगीतुऱ्यात आता मनसेची उडी- ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत दिला आंदोलनाचा इशारा

ठाणे:  घोडबंदर भागातील कासारवडवली येथील तलावावर सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी करण्याच्या प्रस्तवावरून महासभेत शिवसेनेच्याच दोन युवा नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला. या वादात आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून या तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. या तलावाच्या सभोवती सोयीसुविधांची वानवा आहे. मात्र तरीही कोट्यवधींची उधळण येथे होत असल्यास तलावाच्या पाण्याला ‘अर्थपूर्ण’ संबंधांचा वास येत असल्याचा आरोप करून प्रस्ताव रद्द न केल्यास मनसेने ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वादग्रस्त थीमपार्कच्या धर्तीवर या तलावाच्या प्रस्तावाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कासारवडवली येथील तलावाचे शुद्धीकरण व सुशोभीकरण मोहीम काही महिन्यांपूर्वी हाती घेतली. याबाबत सरनाईक यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेताच त्यांनीही सकारात्मक भूमिका घेत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सोमवारच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच स्थानिक शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी तलावाच्या दुरावस्थेचा पाढाच वाचला. त्याने आतापर्यंत या तलावावर खर्च झालेल्या कोट्यवधींच्या खर्चाचीही उजळणी मांडली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी तलावावर पैसे का खर्च केले जात आहेत, याबाबत सारवासारव केली. मात्र या दोन नगरसेवकांच्या वादातून प्रकाशझोतात आलेल्या या तलावाच्या सभोवती पायवाट, रस्ते आदी नसल्याचे समोर आले. या तलावाच्या अशा विकासाला स्थानिक ग्रामस्थांचाही विरोध असल्याने स्मार्ट सिटी म्हणजे केवळ सुशोभीकरण नसून मूलभूत सोयीसुविधाही महत्वाच्या आहेत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरसेवकांच्या भांडणात ग्रामस्थांचे नुकसान न करण्याची मागणी पाटील यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना केली असून तरीही प्रस्ताव रेटल्यास त्यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घोटाळेबाज थीमपार्कची पुनरावृत्ती
‘जुने ठाणे, नवे ठाणे थीमपार्क’ असो वा ‘बॉलिवूड थीम पार्क’ अशा प्रत्येक ठिकाणचे सुशोभीकरण करण्याच्या अर्थपूर्ण हव्यासातूनच याआधी कोट्यवधींचे घोटाळे झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तलावाच्या सुशोभीकरणातून कोट्यवधींची अफरातफर होण्याची भीती आहे. त्यामुळे जनक्षोभ उसळण्याआधी प्रशासनानेच हा प्रस्ताव रद्द करावा.
– संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना