Wednesday, April 23 2025 1:57 am

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी होणार ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांचा सन्मान – शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के

ठाणे 04 – ठाणे शहरासह महाराष्ट्रात अन्य ठिकाणी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान नेहमीच मदतकार्यात पुढाकार घेवून आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सहकार्य करीत असतात. या जवानांचा सन्मान व्हावा किंबहुना त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री 12.00 वा. (14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री)तलावपाळी येथील शिवसेना ठाणे जिल्हा शाखा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचा गौरव केला जाणार असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

तलावपाळी येथील शिवसेना ठाणे जिल्हा शाखा येथे ध्वजारोहणानंतर या जवानांचा सन्मान केला जाणार आहे. आजवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे, त्या ठिकाणी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान हे सर्वात आधी पोहचून मदतकार्यास सुरूवात करतात. नुकतीच शहापूर येथे क्रेन व स्लॅब कोसळून झालेली दुर्घटना, इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना, 19 जुलै 2023 रोजी महाड येथे निर्माण झालेली पुरपरिस्थिती, भिवंडी येथील वर्धमान कॉम्प्‌लेक्स येथे इमारत दुर्घटना, उल्हासनगर येथे पाचमजली इमारत कोसळून झालेली दुर्घटना, संगमनेर येथे मालवाहतूक करणारा ट्रक प्रवरा नदीत पडल्याची घटना, सन 2020 मध्ये महाड येथे झालेली इमारत दुर्घटना, 2022 मध्ये महाड तळीये येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना, चिपळूण येथे निर्माण झालेली पूरपरिस्थ‍िती, सन 2021 मध्ये बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस प्रवाशांसह पाण्यात अडकल्याची घटना अशा आपत्कालीन परिस्थितीत ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने सहकार्याची महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF च्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची निर्मिती सन 2017 मध्ये करण्यात आली. या दलात 33 प्रशिक्षित जवान कार्यरत आहेत. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्यालय हे 24×7 सुरू असून ठाणे आपत्ती प्रतिसाद दल ठाणे शहरात तसेच जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती अथवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास घटनास्थळी जाऊन शोध व बचावकार्ये तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे कार्य करतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगी तहानभूक विसरुन बचावकार्य करणाऱ्या या जवानांबद्दल ठाणेकरांना अभिमान असून या जवानांचे कौतुक व्हावे किंबहुना त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.