Wednesday, January 20 2021 12:02 am

शिवराज्याभिषेकदिन ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार.

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा “स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाणार आहे.

रायगड किल्ल्यावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक दिन.. पण आता हाच दिवस संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरवलं आहे.

महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन या वर्षीपासून स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दरवर्षी महाराजांचा राज्यभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा यादृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे.

आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा, पण आता हा दिन राज्यभर साजरा केला जाणार आहे. सध्या याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यास राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता आड येत आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकींची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभाग याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करणार आहे.