Tuesday, July 14 2020 10:58 am
ताजी बातमी

शिवजयंती उत्सवानिमित्त ठाण्यात गड किल्ले प्रदर्शनासह शिवभूषण पुरस्कार सोहळा

ठाणे :  सकल मराठा समाज ठाणे, यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात  18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मैदानात प्रतिकात्मक गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. शिवजयंती निमित्ताने समाजासाठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱया पाच मान्यवर व्यक्तींना शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवउत्सव समितीचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.
सकल मराठा समाज, ठाणे आयोजित शिवजयंती उत्सवाची सुरुवात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ठाणे महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांच्या हस्ते होणाऱया उद्घाटन कार्यक्रमाने होणार आहे. यावेळी जिद्द शाळा आणि चाईल्ड ऍण्ड यू या शाळेतील गतीमंद आणि दिव्यांग मुले शिवकालीन वेशभूषा करुन सहभागी होणार आहेत. आजच्या पिढीला शिवकालीन इतिहास समजावा व गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांची प्रतिकात्मक उभारणी करण्यात आली आहे.
19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन मासुंदा तलाव परिसरात ढोल ताशा पथक, लेझीम, मर्दानी खेळ, ऐतिहासिक वेशभूषा अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यात अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू अशोक शिंदे, सावंतवाडी सारख्या लहान शहरात पाच महाविद्यालये उभारून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अच्युत सावंत भोसले,  ठाण्यात उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करणारे वास्तुविशारद संजय देशमुख, डॉ. संदीप माने आणि उद्योजक प्रशांत सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक केले जाणार आहे. यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे शहरातील पाच शाळांमध्ये शिवकालिन इतिहासाची माहिती देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले  आहेत. हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱया कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे आवाहन रमेश आंब्रे यांनी केले आहे.