मुंबई :-भारतीय क्रिकेट संघातील धमाकेदार सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेतून कायमचा बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.भारतीय क्रिकेट संघात शिखर धवन च्या जागी ऋषभ पंत या फलंदाजाला विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे. शिखर धवन विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेतून दुखापतीतून बाहेर येणार नसल्याने त्याला स्पर्धेबाहेर जावे लागणार आहे. बीसीसीआयने हे अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर केलं आहे. धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावेळी मँचेस्टर येथे पोहोचला. मात्र ऋषभबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. ‘शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला बॉल लागल्यामुळे फ्रॅक्चर झालं आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेतल्यानंतर असे स्पष्ट झाले आहे की धवनला दुखापतीतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी जुलैच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परिणामी तो वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.’ बीसीसीआयने ट्विट केले आहे. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी यापूर्वी सांगितले होते की संघ व्यवस्थापनाला जायबंदी शिखरला खेळवायचे होते. त्यामुळे व्यवस्थापनाला तो दुखापतीतून कशापद्धतीने बाहेर येतोय हे पाहायचे होते. ‘शिखरच्या दुखापतीवर निर्णय घेण्यासाठी आम्हाला किमान १०-१२ दिवस लागतील. त्याच्यासारख्या उत्तम फलंदाजाला आम्हाला संघाबाहेर ठेवायचे नाही,’ असं बांगर म्हणाले होते.
धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पॅट कमिन्सचा बॉल लागून अंगठ्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागी सध्या संघात ऋषभ पंत इंग्लंडला पोहोचला आहे. त्याच्या संघप्रवेशाबद्दल अद्याप बीसीसीआयने निवेदन दिलेले नाही.