Tuesday, January 21 2025 3:32 am
latest

शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ठामपाच्या शाळेतून मुख्यमंत्र्याचा सहभाग*

ठाणे 27 : परीक्षेला बसणाऱ्या कोट्यावधी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तणावमुक्ती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्यावतीने आभार मानतो. पंतप्रधानानी सांगितल्याप्रमाणे शिक्षक शिक्षण व्यवस्थेमधील महत्वाचा घटक असून उद्याचा भारत, महाराष्ट्र घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य मनापासून करीत रहा, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील विद्यार्थ्यांशी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधला. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने किसननगर येथील शाळा क्र. 23 मध्ये विद्यार्थ्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आभासी माध्यमातून केले होते. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, शिक्षण उपसंचालक,मुंबई संदीप सनवे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, उपायुक्त अनघा कदम, तुषार पवार, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रंथबुके देवून त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थी जी परीक्षा देणार आहेत ती त्यांच्या आयुष्याची परिक्षा नाही ती केवळ त्यांनी केलेल्या अभ्यासाची परिक्षा आहे हे पंतप्रधानांनी त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे आनंदात, हसत खेळत परिक्षेला सामोरे गेले पाहिजे. स्पर्धा आपली दुसऱ्याशी नसून ती आपल्याशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपण दुसऱ्याशी स्पर्धा केली तर पुन्हा नैराश्य येते, असे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशभरातील विदयार्थ्यांसाठी आपला अमूल्य वेळ देणाऱ्या पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शिक्षकांचाही उल्लेख केला आहे. शिक्षक या व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून विद्यार्थ्याला आकार देण्याचे काम ते करीत असतो. मुलांचे भवितव्य आणि भविष्य ते घडवत असतात. उद्याचा महाराष्ट्र आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. शिक्षक ज्ञान दानाचे काम करीत असतो हे काम ‍ पवित्र काम आहे. त्यामध्ये त्यांनी कधीच कसूर करु नये. त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

काही दिवसांपुर्वी पंतप्रधानांच्या आईचे निधन झाले त्यावेळी त्यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांनी तातडीने कामाला सुरूवात केली. देशातील अनेक प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केले ते थांबू दिले नाहीत, लोकांना समर्पित केले, त्यांची ही भावना देशाप्रती असून हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक सहभागी झाले होते. विविध १५० देशातील विद्यार्थी आणि ५१ देशातील शिक्षक आणि ५० देशातील पालकांनी या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमांची नोंद घेतली आहे. या कार्यक्रमात जगभरातील कोटयावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष असून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे असे मार्गदर्शन करतानाचा तुमची मेहनतच तुमचे आयुष्य बदलेल असा मोलाचा सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्याना दिला.

*मुख्यमंत्र्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी*

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते ज्या महापालिका शाळेत शिकले त्या ठाणे महापालिकेच्या किसन नगर शाळा क्रमांक 23 मध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवादही साधल्यानंतर आपल्या शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री हळवे झाले होते. आमचे वर्ग शिक्षक रघुनाथ परब सर होते. त्यावेळी चाळीत आमची शाळा भरायची. आम्ही प्रथम वर्गखोल्या साफ करायचो मग वर्गात बसायचो. पण एक वेगळा यामध्ये आनंद होता. आपल्या महापालिका शाळांमधील विद्यार्थी सुध्दा चांगले घडतील पुढे आपल्या शहराचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करतील. महापालिका शाळांमध्ये शिकलो म्हणजे आपण खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची बरोबरी करु शकत नाही असे नाही. शेवटी विद्यार्थ्याकडे आत्मबळ असले पाहिजे, ‍चिकाटी असली पाहिजे. कधी कधी अपयश ही येते. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही, खचून जाण्याचे कारण नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले पण मी कधीच खचून गेलो नाही. आज राज्याचा मुख्यमंत्री झालो असल्‌याचे त्यांनी नमूद केले.

*एक्झाम वॉरियर पुस्तकाचे मोफत वाटप करा*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहलेल्या Exam Warrior या पुस्तकाचे प्रातिनिधीक स्वरुपात तीन विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले. या पुस्तकात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक महत्वाच्या बाबी असून ठाणे महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक महापालिकेच्यावतीने मोफत देण्याबाबत महापालिका आयुक्त्‍ अभिजीत बांगर यांना सूचित केले.