Thursday, December 12 2024 7:05 pm

शिंदे, म्हस्के दडपशाहीचे धंदे बंद करा‍- खासदार राजन विचारे

शिंदे, म्हस्के दडपशाहीचे धंदे बंद करा; हिंमत असेल तर निवडणुका लावा, राजन विचारे यांचे तडाखे

ठाणे, १७ : ज्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलिसांकडून त्यांची छळवणूक करणाऱया मिंधे गटाच्या शकुनी कारवायांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आज खणखणीत समाचार घेतला.

शिंदे, म्हस्के हे दडपशाहीचे धंदे बंद करा, हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुका घ्या. कोणाची किती ताकद आहे ते तुम्हाला दिसेल असे आव्हान देतानाच ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले त्या पक्षाची बदनामी करताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असे तडाखेही विचारे यांनी लगावले.

मिंधे गटाकडून पोलिसांमार्फत शिवसैनिकांवर सुरू असलेल्या जुलमी कारवायांचा पाढाच राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत वाचला. नौपाडय़ातील माजी नगरसेवक भास्कर पाटील यांना शिवसेनेने विधानसभा क्षेत्रप्रमुखपद देताच जळफळाट झालेल्या मिंधे गटाने या 74 वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक असलेल्या भास्कर पाटील यांना घरातून गाडीत टाकून नेले. जुन्या केसेस काढून त्यांना अडकवण्याच्या धमक्या दिल्या आणि कोरोनामुळे नंतर सातत्याने आजारी असलेल्या पाटील यांना धमकावून मीडियासमोर शिवसेनेविरोधात बोलायला लावले, असे सांगतानाच खासदार विचारे यांनी भास्कर पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनाच पत्रकारांसमोर बोलते केले. जयवंत पाटील यांनीही गद्दार मिंधे गटाने भास्कर पाटील यांच्यावर प्रचंड दबाव टाकून त्यांना विरोधात बोलायला लावले. परंतु भास्कर पाटील कुठेही जाणार नाहीत, असे ठामपणे सांगितले.

. तर म्हस्के कुठे असते?

निष्ठावंत शिवसैनिकांच्या तडीपाऱया केल्या जात आहेत… पोलिसांचा धाक दाखवून शिवसेनेच्या शाखांवर कब्जा केला जात आहे मात्र आधीपेक्षा शिवसेना दुप्पट वाढली आहे, हीच त्यांची पोटदुखी आहे, असे विचारे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या छळाला पंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांचा प्रवेशही निश्चित झाला होता. ही गोष्ट उद्धवजींना कळताच त्यांनी मला फोन केला आणि नरेशला भेट त्याचं ऐकून घे असे सांगितले,त्यानंतर कार्यक्रम अर्धवट सोडून मी म्हस्केंना भेटलो आणि मातोश्रीवर नेले. तेथे उद्धवजींनी म्हस्केंची समजूत काढली आणि नंतर त्यांना विविध पदे देऊन मोठे केले. हे म्हस्के विसरले. त्यावेळी म्हस्केंना मी उद्धवजींकडे नेले नसते तर आज म्हस्के कुठे असते, असा सवाल विचारे यांनी केला.