Friday, January 17 2025 6:11 am
latest

शाळांमधील परसबागांसंबंधी मार्गदर्शनासाठी विठ्ठल कामत आणि विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या स्थापन

मुंबई, 29 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. मुंबई (कोकण विभाग), पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी विठ्ठल कामत यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती आणि नागपूर विभागासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्य करतील.

कोकण आणि पुणे विभागीय समितीमध्ये शिशिर जोशी हे सदस्य असतील. कोकण विभागीय समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य सचिव असतील. पुणे विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद पुणेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य तर पुणे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

अमरावती विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद अमरावतीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि नागपूर विभागासाठी जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव राहतील. नाशिक विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव असतील. विभागीय समितीमध्ये तीन सदस्य निवडीचे अधिकार संबंधित विभागीय समितीच्या अध्यक्षांना असणार आहेत.

ही समिती नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणे, उत्पादित भाजीपाला व त्याचे पोषणमूल्य याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपाययोजना, भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये समावेश करणे, शिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना आदींबाबत मार्गदर्शन करणार आहे.

विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, कृषी विषयाचे पायाभूत ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी पिकविलेल्या ताज्या भाजीपाल्याचा, फळांचा समावेश त्यांच्या पोषण आहारात व्हावा आदी हेतूने राज्यात सर्व शाळा स्तरावर परसबागा निर्माण केल्या जात आहेत. या परसबागा निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.