Wednesday, February 26 2020 8:43 am

शालेय जीवनात मोठे कलादालन मिळाले तर उद्याचे चित्रकार घडतील – सविता आठवले

ठाणे:  ठाणे कलाभवन मध्ये आजपर्यंत दिग्गज चित्रकारांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत. आज शालेय मुलांचे चित्रप्रदर्शन ठाणे कलाभवन सारख्या मोठ्या व्यासपीठावर भरले आहे. असे कलादालन मुलांना उपलब्ध झाल्याने भविष्यातील चित्रकार अशा प्रदर्शनांमधून घडतील असा विश्वास बेडेकर विद्यालयाच्या माजी चित्रकला शिक्षिका सविता आठवले यांनी व्यक्त केला.
गिनीज आणि लिमका वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱया मनिषा ओगले यांच्या रंगोत्सव या संस्थेतर्फे 24 ते 26 जानेवारी दरम्यान ठाणे कलाभवन येथील पहिल्या मजल्यावर सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बेडेकर विद्यालयाच्या माजी चित्रकला शिक्षिका आणि मनिषा ओगले यांच्या गुरु सविता आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्यांनी वरील  विश्वास व्यक्त केला.
सविता आठवले म्हणाल्या की, मोठ्या चित्रकारांची चित्रकला प्रदर्शने मोठ्या कलादालनांत भरतात. ती बघायला रसिक आवर्जून येतात. पण शालेय मुलांची अशी मोठ्या कलादालनात चित्रकला प्रदर्शन भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. अतिशय चांगली मांडणी या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. अशा व्यासपिठांमधूनच उद्याचे चित्रकार घडतील आणि अशी प्रदर्शने लहान मुलांनी आवर्जुन पहावीत असे आवाहन सविता आठवले यांनी याप्रसंगी बोलताना केले.
मनिषा ओगले यांच्या रंगोत्सव या संस्थेतर्फे बालचित्रकारांसाठी रंगोत्सव ही समूह मुक्त विषयावर  चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन आवाहन करण्यात आले. ठाणे आणि मुंबई मधून या स्पर्धेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. निवडक 25 बालचित्रकारांची 100 चित्रे प्रदर्शनासाठी निवडण्यात आली. वस्तुचित्र, स्थिरचित्र, कार्टून, निसर्ग, प्राणी या विविध विषयांवर ही चित्रे बालचित्रकारांनी चितारली आहेत. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान स्टिल् लाईफ या विषयावर आर्टीस्ट जयदीप शेट्टी,  दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान तुषार शेट्टी हे लॅन्डस्केप, 26 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत देवश्री पाटील ह्या मंडला आर्ट, दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत तेजस्विनी कुले या क्राफ्ट आर्ट या विषयावर  सहभागी बालचित्रकारांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदर्शना दरम्यान उपस्थित परीक्षक चित्रांचे परीक्षण करणार असून पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी या गटातील प्रथम व द्वितीय विजेत्यांची निवड करणर आहेत. प्रथम आणि द्वितीय विजेत्यांना अनुक्रमे गोल्ड आणि सिल्व्हर मेडलसह प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरात असे बालचित्रकारांचे चित्र  प्रदर्शन प्रथमच भरत असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे आवाहन मनिषा ओगले यांनी केले आहे.