• ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा
ठाणे 12 : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत, शाडूच्या मातीसाठी १० मूर्तीकारांनी तर, जागेसाठी ०५ मूर्तीकारांनी अर्ज केला आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी, मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी १५ मार्चपर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी. तसेच, जागेसाठीही अर्ज करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तीकारांना उपलब्ध व्हावी, यादृष्टीने मूर्तीकारांनी मातीची मागणी १५ मार्चपर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले आहे. कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे मूर्तीकार संघटनेनेही त्यात पुढाकार घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन प्रधान यांनी केले आहे.
पर्यावरण पूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची १६ जानेवारी रोजी बैठक घेतली. तसेच, ०३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण पूरक गणेशोत्सव नियमावली २०२५ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा. शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. तरी संबंधित मूर्तीकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवार, १५ मार्चपर्यंत कराव्यात, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
धन्वी प्रदूषणविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईन
दरम्यान, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण तसेच अनधिकृत किंवा अनियमित मंडप रचना यांच्याबाबत नागरिकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी ध्वनी प्रदूषणविषयक तसेच, अनधिकृत किंवा अनियमित मंडप रचनांबाबत पुढील क्रमांक किंवा इमेलवर तक्रार करावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर – १८०० २२२ १०८, एसएमएस आणि व्हॉट्सअप सुविधा – ७५०६९४६१५५, दूरध्वनी क्रमांक – ०२२-२५३७१०१०, ई-मेल – rdmc@thanecity.gov.in , pcctmc.ho@gmail.com