ठाणे (20) – ‘मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे’ अभियानातंर्गत हाती घेतलेली सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून शहराचे नवे रुप नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. शहरातील भिंतीवरील आकर्षक व बोलकी चित्रे लक्ष वेधून घेत असून सौंदयीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून पुलाच्या खालच्या जागेचा वापर होत नसल्यामुळे ती पडून राहते किंवा काही वेळा बेघर लोक तसेच सिग्नलवरील विक्रेते त्याचा वापर करतात. हे टाळण्यासाठी पुलाखालच्या जागांचे सुद्धा सौंदर्यीकरण करुन ते वापरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरूवारी (19 जानेवारी) नितिन कंपनी जंक्शन येथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
शहरातील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी नागरिकांना उपयोगी पडतील अशा पध्दतीने या जागा विकसित करणे किंवा तरुण मुलांना खेळण्यासाठी त्या जागा विकसित करणे, काही ठिकाणी रॉक क्लायबिंग सारख्या काही नाविन्यपूर्ण बाबी करणे शक्य आहे का, याची पडताळणी करुन नाविन्यपूर्ण कल्पनाचा विचार करावा अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या. नितिन जंक्शन उड्डाणपुलाखाली विद्युत तारा लोंबकळत असल्याची बाब निदर्शनस आली, याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच या उड्डाणपुलाच्या गर्डरला रंग देण्यात आलेला आहे. मात्र दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत आकर्षक पध्दतीने सौंदर्यीकरण करुन तेथे विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. पुलाखालील मोकळ्या जागेत विकसित केलेल्या उद्यानात विविध प्रकारची सुशोभित झाडे लावण्यात यावीत. तसेच पुलाखाली असलेल्या भंगार अवस्थेतील दुचाकी तातडीने हटविण्याचे आदेश कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना देण्यात आले. उड्डाणपुलाखाली असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह हे नियमित साफ राहिल याची दक्षता घेण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
उड्डाणपुलाखाली सुरू असलेली कामे ही नियोजित वेळेत पूर्ण होतील या दृष्टीने कामाला गती द्यावी तसेच संपूर्ण शहरातील सर्व रस्त्यांवर थर्मोप्लास्ट पेंट करण्याची कामेही पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधितांना दिले.