ठाणे 01 – शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी आज घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली उद्याने, उड्डाणपुलाखालील दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत विद्युत रोषणाई आदी उर्वरित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. आनंदनगर येथील ठाण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दगडी दीपमाळा तयार करण्याचे काम सुरू आहे. या दीपमाळाचे उर्वरित काम व दीपमाळांना विद्युत रोषणाई करुन सदरचे काम हे 15 एप्रिलपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या. आकर्षक रंगसंगतीने आनंदनगर येथील फूटपाथ तयार केले असून रेलिंगलाही आकर्षक रंग देण्यात यावा जेणेकरुन या परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल या दृष्टीने काम लवकरात लवकर करण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.
डेब्रीज हटविण्यासाठी विशेष पथके तयार करावीत
शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी डेब्रीज नजरेस पडेल ते तातडीने उचलले जावे यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातून सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन शिफ्टमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील व डेब्रीज उचलले जाईल याचे नियोजन सुनिश्चित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
हरितपट्टयामधील झाडांची लागवड घनदाट पध्दतीने करावी
रस्त्याशेजारी विकसित करण्यात आलेल्या ट्री बेल्टमध्ये लागवड केलेली झाडे ही आकर्षक व सुशोभित वाटत नसल्याने सदर हरित पट्टा विकसित करताना विविध सुशोभित झाडांची दाट स्वरुपात लागवड केलेली असावी, तसेच त्याची निगा व देखभाल उच्चप्रतीची ठेवण्याबाबतच्या सूचनाही श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या