आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शहर विकास खात्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
शहरात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होणे अपेक्षित आहेच, पण तक्रार आणि माहिती अधिकाराच्या नावाखाली काही व्यवसायिकांना ब्लॅकमेलरकडून नाहक त्रास दिला जातो. यात काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. मुकेश कनाकिया या ब्लॅकमेलरला एका प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आल्यानंतर या आरोपाला आणखी पुष्टी मिळत आहे. आमदार संजय केळकर यांच्याकडे अशा प्रकरणांमध्ये त्रस्त झालेल्या व्यावसायिकांच्या अनेक तक्रारी यापूर्वीच आल्या होत्या. त्यांनी आता थेट पोलीस आयुक्तांकडे काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बांधकाम व्यवसायिकांना नाहक त्रास देऊन त्यांची पिळवणूक करणारे रॅकेट असून ब्लॅकमेलरचा पर्दाफाश करताना महापालिकेतील शहरविकास खात्यातील काही संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी श्री.केळकर यांनी पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त यांच्याकडे केली आहे. रेकॉर्डिंगमध्ये काही अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे कळते. जे बांधकाम व्यावसायिक अवैधपणे बांधकाम करत असतील त्यांना पालिकेने कदापि पाठीशी घालू नये, पण ज्यांना नाहक त्रास दिला जातो, त्यांना अवश्य न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही श्री.केळकर यांनी केली आहे.