Saturday, September 18 2021 1:10 pm
ताजी बातमी

शहरात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाईमहापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केली मार्केटची पाहणी

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. दरम्यान महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वतः नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी करून यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती तसेच दिवा प्रभाग मधील रस्त्यावरील अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. तसेच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्स निष्कासीत करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वत: नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी करून फेरीवाल्यांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, डॉ अनुराधा बाबर, संतोष वझरकर, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, सागर साळुंखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.